शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन शैक्षणिक सहलीला निघालेल्या बसला सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या एसटी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक शिक्षक गंभीर जखमी झाला आहे.
अपघातात ५ ते ६ लहान विद्यार्थी देखील जखमी झाल्याची माहिती आहे. ही दुर्देवी घटना माळशिरस तालुक्यातील वटपळी परिसरात गुरुवारी (२१ डिसेंबर) पहाटेच्या सुमारास घडली. अपघातानंतर स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.
जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी अकलूज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी शैक्षणिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन मंगळवारी (१९ डिसेंबर) कोकण दर्शनासाठी गेली होती. या बसमध्ये चालक, २ पुरुष व २ महिला असे एकूण ४ शिक्षक व ४० विद्यार्थी होते. गुरुवारी पहाटे बस गणपतीपुळे येथून इंदापूरकडे येत होती. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरज परिसरात बस आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.
क्षणार्धात बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोवर जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता, की बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. तर एका शिक्षकासह ५ ते ६ विद्यार्थी देखील जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून एका शिक्षकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय.