नाशिक : मकर संक्रांत म्हटली की, पतंग उडवण्याची मोठी परंपरा आहे. मात्र पतंगासोबत लागणारा नायलॉन मांजा हा पक्षी, प्राणी आणि नागरिकांसाठी त्रासदायक ठरतो. नायलॉन मांजामुळे जखमी होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नायलॉन मांजाने गळा कापण्याच्या दोन घटना नाशिक जिल्ह्यात घडल्या आहेत.
नायलॉन मांजावर व ज्या मांजावर काचेचे धारदार व टोकदार कोटिंग केलेले आहे, अशा मांजाची निर्मिती, विक्री खरेदी व वापर आदींवर प्रतिबंध घालण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. नाशिक जिल्ह्यात नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या अनेक जणांना ताब्यात घेण्यात आले. नाशिकमध्ये 42 जणांवर तडीपारीची कारवाईदेखील करण्यात आली होती. मात्र तरी देखील छुप्या पद्धतीने काही जण नायलॉन मांजाची विक्री करत आहेत. यामुळे सिन्नर आणि कळवण भागात दोन जणांचे गळा कापले गेले आहेत.
मांजाने कापला गळा, दुचाकीस्वार जखमी
सिन्नर तालुक्यात एक जण दुचाकीवरुन जात असताना पतंगाच्या मांजाने गळा कापला जाऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना संगमनेर नाका परिसरात घडली. उत्तम विष्णू आव्हाड (49 रा. वडझिरे, ता. सिन्नर) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार उत्तम आव्हाड आपल्या पत्नीसह मोटारसायकलने वावी वेसकडून संगमनेर नाक्याकडे जात होते. यावेळी पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्यात अडकल्याने त्यांचा गळा कापला. तसेच अकडलेला मांजा बाजूला करताना त्यांचा उजव्या हातास देखील दुखापत झाली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आव्हाड यांना नाशिक येथील खासगी उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार मानकर करत आहेत.
पैठणी घेण्यासाठी आलेल्या तरुणाचा कापला गळा
कळवण येथून येवल्यातील रेल्वेस्टेशन परिसरात पैठणी घेण्यासाठी आलेला नीरज सुमीत राठोड (वय ३०, रा. कळवण) हा दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. या घटनेत राठोड याच्या गळ्याला तब्बल आठ टाके पडले आहेत. त्याला उपचारासाठी तत्काळ येवला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कळवण येथून येवल्यात आलेल्या राठोड याचा नायलॉन मांजाने गळा कापल्याने त्याने दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभी केली. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना त्याच्या मानेतून होणारा रक्तस्त्राव दिसल्याने परिसरातील नागरिक त्याच्या मदतीला धावले. त्यांनी राठोड याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.