सोलापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूरमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित आहेत. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पुर्ण होण्याची गॅरंटी, असे म्हणत विरोधकांवर निशाणा साधला.
“पंढरपुरचा विठ्ठल आणि सिद्धेश्वर महाराज यांना मी नमस्कार करीत आहे. ही वेळ आपल्या सर्वांसाठी भक्तीभावानं भरलेली आहे. २२ जानेवारीला ऐतिहासिक क्षण येणार आहे. तेव्हा आपले भगवान राम आपल्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत,” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराघरात रामज्योती लावा, असे आवाहनही सोलापूरवासियांना केले.
“मी सोलापूरवासियांना महाराष्ट्रवासियांचे खूप खूप अभिनंदन करतो. मी आता मुख्यमंत्र्यांना ऐकत होतो. ते म्हणाले की मोदींच्यामुळे महाराष्ट्राचा गौरव वाढत आहे. शिंदेजी, हे ऐकून चांगलं वाटतं. नेत्यांना तर अधिक चांगलं वाटतं. खरं हे आहे की महाराष्ट्राचं नाव रोशन होतंय ते महाराष्ट्राच्या जनतेमुळे आणि प्रगतीशील सरकारमुळे होतेय,” असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
देशातील २५ कोटी लोकांनी गरिबीला पराभूत केलं हे मोठं यश आहे. देशाच्या गरिबांना सुविधा दिल्या. साधने दिली. त्यांची चिंता दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सर्वात मोठी चिंता दोन वेळची भाकरी…आमच्या सरकारने गरिबांना मोफत रेशन देऊन चिंतामुक्त केलं. अर्धी रोटी देण्याच्या घोषणा दिल्या नाहीत,” असा टोलाही यावेळी विरोधकांना लगावला.