अयोध्येमध्ये राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर आता तिथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी लोटल्याचं दिसत आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने अयोध्येत मोठा सोहळा पार पडला. यासंदर्भात देशभरातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, बाबरी खटल्यात मुस्लीम गटाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी यासंदर्भात भूमिका मांडताना मोठं विधान केलं आहे. “आपण विविधता असणारा देश आहोत. पण आपली वाटचाल हळूहळू हिंदू राष्ट्राच्या दिशेनं होऊ लागली आहे”, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यांच्या या विधानावर आता चर्चा होऊ लागली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेचे विधी करण्यात आले. राम मंदिराचं बांधकाम नियोजनाप्रमाणे पूर्ण होण्यास अद्याप अवकाश असला, तरी प्राणप्रतिष्ठेनंतर आता अयोध्येमध्ये भाविकांना दर्शन खुलं करण्यात आलं आहे. त्यामुळे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रमाणेच आता दर्शनासाठीही मोठी गर्दी लोटल्याचं चित्र अयोध्येत पाहायला मिळत आहे. हा सोहळा आटोपल्यानंतर आता त्यावर राजकीय वर्तुळात दावे-प्रतिदावे होऊ लागले आहेत. बाबरी खटल्यात सुन्नी वक्फ बोर्ड व इतर मुस्लीम गटांतर्फे सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करणारे ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये यासंदर्भात मोठी भीती व्यक्त केली आहे.
काय म्हणाले राजीव धवन?
टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार राजीव धवन यांनी राम मंदिराचं राजकीयीकरण करण्याला तीव्र विरोध केला आहे. “कुणीही मंदिराच्या विरोधात नाही. पण त्याच्या राजकीयीकरणाला आमचा विरोध आहे. खरी बाब म्हणजे सरकारनं मंदिराच्या कामात आर्थिक मदत केली. नृपेंद्र मिश्रा हे एक सरकारी अधिकारी होते. त्यांना राम मंदिर बांधकामाचं प्रमुख बनवलं. आपण हळूहळू हिंदू राष्ट्र होण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहोत. हे आपल्या राज्यघटनेच्या विरुद्ध आहे. आपण विविधता असणारा देश आहोत. पण या प्रकारचं राजकीयीकरण या विविधतेकडेच दुर्लक्ष करते”, अशी परखड भूमिका राजीव धवन यांनी मांडली आहे.
“प्रभू श्रीराम सगळ्यांचे आहेत असं म्हणण्यात काहीही अर्थ नाही. ते सगळ्यांचे आहेतच. पण त्यासाठी तुम्हाला ते इतकं ठळकपणे बिंबवण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही. हे राजकीयीकरण आपल्या सर्व नीतीमूल्यांच्या विरोधी आहे”, असंही धवन यांनी नमूद केलं.
“जय श्री राम’चा हत्यार म्हणून वापर का करताय?”
‘जय श्री राम’ या घोषणेचा शस्त्र म्हणून वापर का करताय? असा थेट प्रश्न राजीव धवन यांनी उपस्थित केला. यासाठी त्यांनी खटल्यावेळी घडलेल्या एका प्रसंगाचा संदर्भ दिला. “मी जेव्हा युक्तिवादासाठी न्यायालयात प्रवेश करायचो, तेव्हा ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या जायच्या. माझ्यावर न्यायालयात झालेल्या हल्ल्यातून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मला वाचवलं. मला तेच पुन्हा उगाळायचं नाहीये. जय श्री राम म्हणण्यावर कुणाचा काहीच आक्षेप नाही. पण त्याचा शस्त्र म्हणून वापर का करायचा?” असा सवाल राजीव धवन यांनी केला आहे.
“हे सरकार फक्त हिंदूंसाठी आहे हे स्पष्ट होतंय”
दरम्यान, देशातलं सरकार फक्त हिंदूंसाठीच आहे, असं चित्र सध्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले. “कुंभमेळा काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे अशा गोष्टींचं राजकीयीकरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे दोन संधी आहेत(राम मंदिर आणि कुंभ मेळा). हे स्पष्टच दिसतंय की या सरकरानं कितीही दावे केले, तरी हे सरकार फक्त हिंदूंसाठीच आहे”, असंही धवन यांनी नमूद केलं.