कल्याण : रामोत्सवाचा आनंद साजरा करत कल्याण मधील २० जणांनी शहरात दुचाकींवरून फेरी काढली होती. ही फेरी दुर्गाडी किल्ल्या जवळील गोविंदवाडी बाह्यवळण रस्त्या जवळील पुलावर गेल्यावर तेथे अज्ञात इसमांनी दोन दगड दुचाकी स्वारांच्या दिशेने भिरकावले. यामध्ये एका दुचाकीचे नुकसान झाले आहे, अशी तक्रार एका दुचाकी स्वाराने बाजारपेठ पोलीस ठाण्यात केली आहे.
गोविंदवाडी पुलाखाली एक अज्ञात जमाव होता. त्यामधील एका इसमाच्या हातात धारदार शस्त्र होते. हा इसम संतप्त झाला होता. त्याला इतर जमाव रोखून धरत होता, असेही बाजारपेठ पोलीस ठाण्यात दयाप्रभू शेंडकर (२४), बबलू यादव यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी सांगितले, तक्रारदार दयाप्रभू शेंडकर, त्याचा मित्र भावेश शिंदे, बबलू यादव हे सोमवारी २० दुचाकींच्या समुहाने दुर्गाडी किल्ल्या जवळील गोविंदवाडी बाह्यवळण पुलाजवळून जात होते. त्यावेळी पुलाखालून अज्ञात इसमांनी जोराने दोन दगड फिरकावले. एक दगड तक्रारदाराच्या दुचाकीच्या पुढे, एक दगड दुचाकीच्या पाठीमागील बाजुला पडला. पाठीमागील दगडाने दुचाकीची वाहन क्रमांकाची पट्टी तुटली आहे. दुचाकीवरील तक्रारदार आणि त्याचा मित्र सुदैवाने दगडफेकीतून बचावले.
बबलू यादव याने पुलाखाली पाहिले तर एक जमाव तेथे जमला होता. त्यामधील एकाकडे धारदार शस्त्र होते. तो इसम संतप्त झाला होता. त्याला इतर लोक रोखून धरत होते. ४० वर्षाचा हा इसम होता. असे तक्रारीत म्हटले आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.