नागरिकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, अपूर्ण झोप अशा विविध कारणांमुळे हृदयविकाराचे झटके येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. फक्त वयोवृद्ध व्यक्ती नाही तर तरुण मुलामुलींना देखील हार्टअटॅक येण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. काल देखील रामलीला सादर करताना एका कलाकाराचा हार्टअटॅकने मृत्यू झाला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, काल सोमवारी अयोध्येत रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या कार्यक्रमाचा जल्लोष संपूर्ण भारतात साजरा करण्यात आला. नागरिकांनी आपल्या राहत्या ठिकाणी विविध पद्धतीने आनंद आणि दिवाळी साजरी केली.
हरियाणामधील भवानी येथे देखील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं सेलिब्रेशन सुरु होतं. येथील नागरिकांनी कार्यक्रमात रामलीला आयोजित केली होती. यामध्ये २५ वर्षांचा तरुण हनुमान देवाची भूमिका साकारत होता. अभिनय करताकरता त्याच्या छातीत दुखू लागले आणि त्याला तीव्र हृदयविकाराचा झटका आला.
सदर घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओमध्ये तरुण हनुमानाचं पात्र साकारत आहे. सर्व भाविक आनंदाने ही रामलीला पाहत आहेत. तितक्यात हनुमान असलेल्या तरुणाला हार्टअटॅक येतो आणि तो खाली कोसळतो. सुरुवातीला उपस्थितांना तो नाटक करत असावा असं वाटतं.
मात्र बराचवेळ तो जागेवर पडून राहतो. त्यानंतर सर्वजण त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात. त्याची तब्येत पाहून उपस्थितांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टर सांगतात. ही माहिती मिळताच तिथे उपस्थित सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते.