बंगळुरू येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. बहिणीचे दुसऱ्या धर्मातील मुलावर प्रेम असल्याने रागाच्या भरात भावाने आपल्या बहिणीला तलावात ढकलून दिले आहे. यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एवढेच नव्हे तर, मुलीला वाचवण्यासाठी आईनेदेखील तलावात उडी मारली. यात आईचादेखील मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हंसुर तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. आई अनिता (वय ४५), मुलगी धनुश्री (१९) असे मृत महिलांची नावे आहेत. तर नितीश(वय २१) असे आरोपी भावाचे नाव आहे. धनुश्री बी कॉमची विद्यार्थिनी होती. या घटनेनंतर अग्निशमन दल आणि आप्तकालिन सेवा कर्मचाऱ्यांनी मृतदेह तलावाबाहेर काढले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी आरोपी नितीशला हुनसूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. धनुश्री ही तिच्या आजीच्या घरी हनागोडू येथे राहायची. ती हुन्सूर येथे राहणाऱ्या एक तरुणाच्या प्रेमात पडली होती. ही गोष्ट भाऊ नितिशला समजल्यावर तो खूप चिडला. त्याने त्या मुलाला धमकावेदेखील होते. त्यानंतर काही दिवसांना आपली बहिण त्या मुलाच्या संपर्कात आहे हे नितिशला समजले. त्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
नितिशने बहिण धनुश्रीला नातेवाईकांकडे घेऊन जातो असे सांगितले. धनुश्रीदेखील त्याच्यासोबत गेली. मात्र, नितिशच्या डोक्यात काहीतरी वेगळाच प्लान होता. याचा त्यांच्या आईला संशय आल्याने तीदेखील त्यांच्या मागे गेले.
मारुरु गावात पोहचताच, नितिशने बहिणीला तलावात ढकलून दिले. रात्री साडेदहाच्या सुमारास हि घटना घडली. त्यावेळी आईने धनुश्रीला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. यावेळी त्या दोघींचाही बुडून मृत्यू झाला.
नितिशने घरी आल्यावर त्याच्या बाबांनी त्याला आई आणि बहिणीबद्दल विचारले. तेव्हा त्यांना पाण्यात ढकलल्याने नितिशने सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी नितिशला अटक केली आहे.