उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅन्सर पीडित चिमुकल्याचा गंगास्नान करताना सलग १५ मिनिट डुबकी मारल्याने मृत्यू झाला आहे. गंगेत डुबक्या मारल्याने मुलगा गंभीर आजारातून बरा होईल या भाबड्या आशेने काकीने हे कृत्य केलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडामधील हरिद्वारमध्ये मुलगा रवी सैनी आपल्या कुटुबियांसह आला होता. काही दिवसांपूर्वी चिमुकल्याला कॅन्सर या गंभीराने ग्रासलं होतं. मात्र हरिद्वार येथे गंगास्नान केल्याने काहीतरी चमत्कार घडेल आणि आपला मुलगा गंभीर आजारातून बरा होईल, अशी मुलाच्या पालकांना आशा होती. नवभारत टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
बुधवारी दुपारी रवीची काकी सुधा त्याला घेऊन गंगा नदीच्या काठावर गेली. तिथे सुधाने रवीला पाण्यात बुडवून ठेवले. असं केल्याने रवी गंभीर आजारातून बरा होईल, अशी आशा तिला होती. जवळपास ५ मिनिटे रवीला सुधाने पाण्यात बुडवले. ही सर्व घडत असताना आजूबाजूचे लोक याला विरोध देखील करत होते. मात्र रवीच्या काकीने कुणाचंही ऐकलं नाही.
त्यानंतर नागरिकांनी जबरदस्तीने कसंबसं रवीला पाण्यातून बाहेर काढलं आणि काठावर नेले. मुलाला पाण्यातून बाहेर काढले त्यावेळी त्याची शुद्ध हरपली होती. रवीला तात्काळ जवळील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांना त्याला मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून रवीची काकी सुधा, वडील राजकुमार आणि आई शांती यांना ताब्यात घेतले. पोलीस अधिक तपास करत आहेत.
रवीचे वडील राजकुमार यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रवीला कॅन्सर आजाराने ग्रासलं होतं. रवीचा कॅन्सर सध्या अॅडव्हान्स स्टेजवर पोहोचला होता. सध्या त्याच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते.