कुंभारी : गावातील शांतता अबाधित राहावी, एकमेकाबद्दल विश्वास वाढावा आणि नातं टिकावी यासाठी प्रत्येकानीं संयमाने वागावे. कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. प्रत्येकांनी शांततेचे पालन करावे. आरोपींवर योग्य कारवाई करण्यात येईल, असे मत पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी व्यक्त केले.
कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. प्रारंभी पारधी समाज वस्तीमध्ये आरसीपी व पोलिसांचे पथसंंचालन झाले. त्यानंतर लक्ष्मी मंदिरात शांतता समितीची बैठक झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीला सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर, अक्कलकोटचे विभागीय पोलीस अधीक्षक विलास यामावार, वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रत्येकाने ज्ञानाचा, बुद्धीचा वापर प्रगतीसाठी करावा आणि यातून गावाचा विकास साधावा. गुन्हेगारी कृतीपासून लांब राहून प्रत्येकाने उद्योग, व्यवसाय सुरू करावेत. पारधी समाजातील युवकांनी शिक्षणाची कास धरून पोलीस भरतीसह अन्य शासकीय, प्रशासकीय नोकऱ्यांसाठी प्रयत्न करावा. यासाठी आवश्यक ती मदत करण्यास मी तयार आहे. पारधी समाज बांधवांनी स्वतःवरील गुन्हेगारीचा कलंक पुसून काढण्यासाठी शिक्षणाच्या प्रवाहात यावे आणि गैरकृत्यापासून दूर राहावे असे आवाहन पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी केले.
यावेळी पारधी समाज बांधवांनी पोलीस अधीक्षकांसमोर पाणी, सार्वजनिक शौचालय, शासकीय योजना, जाती दाखले याबाबत येत असलेल्या अडचणी मांडल्या. त्या अडचणी सोडवण्यासाठी मी स्वतः जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याची हमी त्यांनी दिली. काही अडचणी आल्यास तात्काळ तुम्ही वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल सनगल्ले यांच्याशी संपर्क साधून तक्रारी मांडा. त्यावर मार्ग काढण्यात येईल. विनाकारण गैरकृत्य किंवा कायदा हातात घेऊन शांतता बिघडू नका असे आवाहनही पोलीस अधीक्षकांनी यावेळी केले.
वृद्धा आजीबाईचा घेतला चहा
लक्ष्मी मंदिरात शांतता समितीची बैठक झाल्यानंतर पारधी समाजातील वृद्ध आजीबाईंनी स्वतःच्या घरात बनवलेला चहा आणून पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांना दिला. तो त्यांनी स्वीकारत आजीबाईंची विचारपुस केली आणि आपण ज्येष्ठ आहात समाजातील तरुणांना मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा त्यांच्यासमोर पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केली.