कुंभारी :-(निर्मला जवळे) होटगी मठाचे मठाधिपती चेन्नवीर शिवाचार्य महास्वामी यांच्या 68 व्या पुण्यस्मरण उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या आत्मज्योत मिरवणुकीत एसव्हीसीएस प्रशालेच्या विद्यार्थिनींनी विविध गाण्यावर नृत्य सादर करत मने जिंकली. या नृत्याविष्कारात भारतीय संस्कृती, परंपरेचे दर्शन त्यांनी घडविले. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या भारदार लेझीम, टिपरी नृत्य पाहून मिरवणुकीत सहभागी झालेले भक्त भक्तीरसात न्हाहून गेले.
सोलापूर शहरातील उत्तर कसबा येथून निघालेली ही मिरवणूक मधला मारुती, माणिक चौक, जिल्हा परिषद, रंगभवन, सात रस्ता, आसरा चौक, हत्तुरे वस्ती, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखानामार्गे होटगीला पोहचली. होटगीत मिरवणुकीचे मोठ्या भक्ती भावात स्वागत करण्यात आले. यावेळी गावातून प्रदक्षिणा घालण्यात आली. रथोत्सवानंतर आत्मज्योत मिरवणुकीची सांगता होटगी येथील मठामध्ये करण्यात आली. यावेळी काशीपिठाचे जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्याय शिवाचार्य महास्वामी, होटगी मठाचे मठाधिपती बाल चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.