दिल्ली – शिक्षकांनी प्रवेशपत्र देण्यास नकार दिल्यामुळे एका विद्यार्थ्याने जीवन संपवलं आहे. ही धक्कादायक घटना दिल्लीतील आहे. दिल्लीतील आर्मी पब्लिक स्कूलच्या एका विद्यार्थ्याने विषारी द्रव्य प्राशन करून जीवन संपवलं आहे. कुटुंबीयांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. या मृत विद्यार्थ्याच्या वडिलांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मुलाने शाळेची खुर्ची तोडली होती. त्यामुळे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी त्याला दहावीचं प्रवेशपत्र देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांना संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले आहे. मुख्याध्यापकांनी त्यांच्या मुलाचा खूप छळ केला. प्रवेशपत्र देण्यासही नकार दिला. या कारणामुळे त्यांच्या मुलाने आत्महत्या केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
वडिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा मुलगा धीरज हा आरकेपुरम येथील आर्मी स्कूलमध्ये दहावीचा विद्यार्थी होता. त्याच्याकडून काही दिवसांपूर्वी शाळेतील एक खुर्ची तुटली होती, त्याबद्दल धीरजने माफीही मागितली होती. मात्र मुख्याध्यापकांनी त्याचं ऐकलं नाही. त्यांनी धीरजच्या आईला फोन करून शाळेत बोलावून घेतलं होतं. तेथे धीरजला त्याच्या आईसमोर अपशब्द वापरले. तसेच तुटलेल्या खुर्चीसाठी 10 हजार रुपये दंडाची मागणी केली. धिरजच्या आईने दंड भरण्याचेही मान्य केले होते. मात्र, असे असतानाही मुख्याध्यापकांनी धीरजला प्रवेशपत्र देण्यास नकार दिला होता. मुख्याध्यापकांसोबतच आणखी एका शिक्षकानेही धीरजला खूप खडसावले होते. हे सर्व पाहून धीरज खचला, तो खूप निराश झाला. रडत घरी आला. घरात तो कोणाशीही बोलला नाही.
10 फेब्रुवारी रोजी त्यानी विषारी द्रव्य प्राशन केलं. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, डॉक्टरांना त्याचा जीव वाचवता आला नाही. त्याचा मृत्यू झाला. धीरजच्या वडिलांनी कायदेशीर लढाई असणार असल्याचं सांगितलं आहे.
मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र, मृत विद्यार्थ्याकडून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. पोलीस सध्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांशी बोलत आहेत. दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.