पोलीस भरती पेपरफुटी प्रकरणी योगी सरकारने मोठी कारवाई केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेवरून पोलीस आणि एसटीएफने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये छापे टाकून ३९१ आरोपींना अटक केली. पोलिसांनी त्यांच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांची कारागृहात रवानगी केली आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणात संशयितांची चौकशी करण्यात येत आहे. पोलीस भरती परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका फुटल्याची घटना समोर आल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी यूपी पोलीस आणि एसटीएफला आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देशही दिले होते.
मुख्यमंत्री योगींच्या सूचनेनंतर पोलीस आणि एसटीएफ सक्रिय झाले असून त्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये छापे टाकून ३९१ आरोपींना अटक केली. कारवाईदरम्यान, पोलीस आणि एसटीएफने आरोपींकडून मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे (आधार कार्ड, प्रवेशपत्र), फिंगरप्रिंट पेपर, पासबुक, चेकबुक, स्टॅम्प, शाई पॅड, सिलिकॉन स्ट्रिप आणि रोख रक्कम जप्त केली आहे.
यासोबतच मोबाईल फोन, बनावट उत्तर की, कॉपी स्लिप, मूळ गुणपत्रिका, ब्लूटूथ, इलेक्ट्रॉनिक उपकरण, वॉकी टॉकी सारखे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांच्या कारवाईत उत्तर प्रदेशसह हरियाणा, बिहार आणि दिल्लीतील आरोपींना पकडण्यात आले आहे.
पोलिस आणि एसटीएफच्या रडारवर आणखी अनेक टोळ्या असून, त्यांच्यावर नजर ठेवण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या एक-दोन दिवसांत आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.