उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगातील कारने ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. अपघाताची घटना महामार्गावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महामार्गावर एका ट्रकला मागून धडक दिल्यानंतर कार पलटी होत, असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. या अपघातात दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकाच कुटुंबातील अन्य चार जण या अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
कारचा टायर फुटल्याने हा अपघात झाला आहे. कारचे टायर फुटले, त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार पुढे जात असलेल्या ट्रकला धडकली. ट्रकला धडक दिल्यानंतर कार महामार्गावर दोन ते तीन वेळा पलटी झाली. त्यानंतर कार महामार्गावरील दुभाजकाला धडकली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन महिला या सासु आणि सून होत्या.
हा अपघात रविवारी (२५ फेब्रुवारी) पूर्वांचल महामार्गावर माईलस्टोन ८९ जवळ घडला. हे कुटुंब काशी विश्वनाथाचं दर्शन घेण्यासाठी आणि लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी वाराणसीला जात होते. परंतु रस्त्यातच टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. गाडी त्यांचा मुलगा मुकुल अरोरा चालवत होता. या अपघातात त्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना दर्शन नगर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातात एक बालक सुखरूप बचावल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. त्यांनी मृत महिलांचे मृतदेह आपल्या ताब्यात घेतले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले (Car Truck Accident) आहेत. अपघाताची चौकशी सुरू केली आहे. त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांनाही या अपघाताची माहिती दिली आहे.