सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात उन्हाळा सुरू होताच दुष्काळाच्या तीव्रतेने जाणवत आहेत. त्यातूनच पाण्यासाठी संघर्ष होत असताना सांगोला तालुक्यातील जुनोनी गावात शेतकऱ्यांनी शेतातील पिके वाचविण्यासाठी टेंभूउपसा योजनेचा कालवा फोडून पाणी पळविल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी प्रशासनाने २३ शेतकऱ्यांविरूध्द फौजदारी कारवाई केली आहे.
सांगोला तालुक्यात शेती सिंचनासाठी टेंभू योजनेचे पाणी आटपाडी भागातून कालव्याद्वारे सोडण्यात आले होते. नियमाप्रमाणे पाण्याचा प्रवाह शेवटच्या टोकापर्यंत कडलास, बुरूंगेवाडी, वाटंबरे, राजुरी आदी भागासाठी सुरू होता. दरम्यान, या योजनेच्या कालवा क्रमांक १२.७०० किलोमीटर आऊटलेट येथे देखरेखीसाठी जलसंपदा विभागाचे कर्मचारी तैनात होते. तथापि, दुपारी दुचाकी आणि चार चाकी स्कार्पिओ मोटारीतून (एमएच ४६ एन ८२८१) २० ते २५ शेतकरी जुनोनी येथे कालव्याजवळ आले. या जमावाने सोबत जेसीबी यंत्रही आणले होते.
जेसीबीच्या साह्याने कालव्याचे आऊटलेट फोडून पाणी पळविण्यात आले. याप्रकरणी विकास श्रीराम, शिवाजी काळे, शिवाजी होनमाने, दगडू होनमाने, सचिन आटील (रा. जुनोनी) यांच्यासह एकूण २३ शेतकऱ्यांविरूध्द जलसंपदा विभागाच्या फिर्यादीनुसार सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.