मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. जोपर्यंत सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. तसेच उपोषण सुरू करतानाच विधानसभा निवडणुकीसाठीची तयारीही सुरू केली आहे. सरकारने आरक्षण नाही दिलं तर 288 उमेदवार निवडणुकीत उभं करण्याचा इशारा जरांगे यानी दिला होता, त्यानुसार जरांगे यांनी कामाला सुरुवात केली आहे. तसेच इच्छुक उमेदवारांना भेटण्याचं आवाहनही केलं. याशिवाय जरांगे यांनी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठीचा फॉर्म्युलाही स्पष्ट केला आहे.
येत्या 13 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत मतदारसंघनिहाय तयारी करायची आहे. ज्यांना निवडणूक लढायची आहे. अशा इच्छुकांनी अंतरवाली सराटीत यायचं आहे. सर्व जाती धर्माचे इच्छुक भेटण्यासाठी येऊ शकतात. जे इच्छुक आहेत, त्यांच्याशी चर्चा करून पुढचा निर्णय घेतला जाईल, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
20 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान मतदार संघनिहाय चर्चा करायची आहे, यावेळीही इच्छुकांनी यावे. आपल्याला आंदोलनाला 29 ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या दिवशी राज्यस्तरीय बैठक घेण्यात येईल. त्याच दिवशी उमेदवार पाडायचे की निवडून आणायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आपण निवडणूक लढणार असल्याचं म्हटल्यावर महाविकास आघाडीवाले खूश होतात. निवडणूक नाही लढायची म्हटलं तर महायुतीवाले खूश होतात. महाविकास आघाडी आणि महायुतीवाले गोधडी टाकून बुक्क्या मारत आहेत जर उमेदवार उभे करायचे नसतील तर जो आपल्याला लिहून देईल, ओबीसी आरक्षणातून आरक्षण देण्याची मागणी करेल त्याला निवडून द्यायचे आहे. मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, असं आवाहन त्यांनी केलं.
यावेळी मनोज जरांगे यांनी विजयाचा फॉर्म्युलाही सांगितला. आमचं समीकरण जुळलं आणि चारपाच जाती एकत्र आल्या तर सत्ता आपलीच येईल, असा फॉर्म्युलाच त्यांनी सांगितला. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, धनगर समाजाला आरक्षण देऊ. त्याचे काय झाले? मी शेवटचं सांगतो, आम्हाला राजाकरण करायचं नाही. आमं आम्हाला द्या. असा एक मतदार संघ असा नाही की, ज्या ठिकाणी मराठा समाजाचे 50 हजार मतदार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.
एका जातीच्या मतांच्या आधारावर कुणीही निवडून येऊ शकत नाही. त्यासाठी जातीचे समीकरणं जुळवावे लागतं. यांना आरक्षणाच्या मागणीबाबत काहीही देणं घेणं नाही. यांनी आता जागा वाटप सुरू केल आहे. हे तोंडावर गोधड्या टाकून आपल्याला मारत आहेत. जर आमचं समीकरण जुळले नाही तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्याला मतदान करू. मग तो कोणत्याही समाजाचा आणि पक्षाचा असला तरी हरकत नाही, असं सांगतानाच पण मी पुढे काय करेन हे आताच सांगता येणार नाही. येत्या 29 ऑगस्ट रोजी मी डाव टाकतो, असंही ते म्हणाले.