मुंबईसह राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक भागात धबधबे ओसंडून वाहत आहेत. तर धरण क्षेत्रातील नदी-नाले वाहत आहेत. अनेक ठिकाणी निसर्गाने हिरवागार शालू नेसला आहे. पावसाळी पर्यटनासाठी अनेक जण बाहेर पडत आहेत. अनेक भागात पाण्याच्या पातळीत अचानक वाढ होत आहे. तर काही ठिकाणी खोल खड्यांचा, निसरड्या भागाचा अंदाज न आल्याने पर्यटकांच्या मृत्याच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे पर्यटन स्थळी उताविळपणा, अति साहस टाळण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. कॉलेजला बुट्टी मारुन पर्यटन स्थळी गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कॉलेजला बुट्टी मारून पुाच मित्र मावळमधील कासारसाई धरणावर गेले होते. त्यातील एकाला जीव गमवावा लागला.पिंपरी-चिंचवडच्या थेरगाव येथील एका कॉलेजचा विद्यार्थी सारंग डोळसे याचा कासारसाई धरणातील पाण्यात बुडून मृत्यू झाला.
थेरगाव येथील ज्युनियर कॉलेजचे पाच विद्यार्थी घरातील पालक आणि शिक्षकांची नजर चुकवून कासारसाई धरणावर पर्यटनासाठी आले होते. धरणातील पाण्यात उतरून खेळण्याचा मोह या विद्यार्थ्यांना आवरला नाही .पाण्यात खेळत असताना पाण्याच्या खोलीचा सारंगला अंदाज आला नाही आणि क्षणार्धात खोल पाण्यात वाहून गेला.
मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर गावातील नागरिकांनी शिरगावं परंदवाडी पोलिसांना तात्काळ या घटनेची खबर दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वन्यजीव रक्षक मावळ, तसेच लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीमला पाचारण केले. रेस्क्यू टीमने काही वेळातच या विद्यार्थ्यांचा मृतदेह बाहेर काढला,
भुशी धरणाच्या पायऱ्यांवरील पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटकांना पायऱ्यांवर मज्जाव करण्यात आला आहे. मात्र पर्यटक जीवावर उदार होऊन पर्यटन करत असल्याचे चित्र आहे.लोणावळ्यात धुव्वा धार पाऊस झाल्याने भुशी धरणावरील पायऱ्यांवरील प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पर्यटकांना या भुशी धरणाच्या पायऱ्यांवर मज्जाव करण्यात आला आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी स्थानिक जीवरक्षक तसेच पोलिसांकडून पर्यटकांना भुशी धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे.मात्र पोलीस आणि स्थानिक जीवरक्षक यांच्याशी पर्यटक हुज्जत घालत या पायऱ्यांवर जात आहेत. लोणावळा दुर्घटनेनंतर देखील पर्यटकांना शहाणपण आलं नसल्याचं यातून दिसत आहे.