मुंबई – मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर सोमवारी कायम राहिला. सोमवारी सकाळपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. यामुळे मुंबईत तीन एनडीआरएफच्या टिम तैनात करण्यात आल्या आहेत. सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सातारा, नागपूर, गोंदिया, गडचिरोलीत ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच भंडारा जिल्ह्यात रेड अलर्ट दिला आहे.
नागपूरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच एनडीआरएफची एक टीम तैनात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढलेला आहे. रविवारी रात्रीपासून मुंबई आणि उपनगरात पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. मुंबईमधील रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक सध्या सुरळीत सुरु आहे. वसई (पालघर), ठाणे, घाटकोपर, पवई (कुर्ला), महाड (रायगड), खेड आणि चिपळूण (रत्नागिरी), कुडाळ (सिंधुदुर्ग), कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी एनडीआरएफ पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय तीन टीम मुंबईत आणि एक टीम नागपूर येथे नियमित तैनात करण्यात आली आहे. सखल भागात आणि भूस्खलन प्रवण भागात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी एनडीआरएफ सतर्क आहे.
लोणावळ्यात मागील 24 तासांत 151 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पर्यटन नगरी असलेल्या लोणावळ्यात सध्या पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. आतापर्यंत लोणावळ्यात 2173 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गडचिरोली मेडिगट्टा लक्ष्मी धरणाचे सर्व दरवाजे उघडले आहे. या धरणाला एकूण 85 दरवाजे असून 85 पूर्णपणे उघडले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. पुण्यात सकाळपासून रिमझीम पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे शहराला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुणे वेधशाळेकडून शहरात पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे.