जालना शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून बांधकाम व्यवसायीकांना त्रास देणार्या गुन्हेगार व गुंडावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी जालना येथील बांधकाम व्यवसायीकांनी पोलीस अधिक्षक यांच्याकडे केलीय. या संदर्भात सोमवार दि. 22 जुलै 2024 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास पोलीस अधिक्षक यांना निवेदन देखील देण्यात आलंय.
यावेळी बांधकाम व्यवसायीकांनी अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांची भेट घेत शहरातील गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केलीय. यावेळी बांधकाम व्यवसायीक अभय कुलकर्णी, डॉ. विठ्ठल पवार, अविनाश भोसले, दीपक बदर, अंकित आबड, रवींद्र हूशे, अनुराग अग्रवाल, रोहित गौड, राम गौड यांची उपस्थिती होती. जालना शहरात अनेक प्रकारचे लहान मोठे गुन्हे घडत आहेत, तसेच बांधकाम व्यवसायीकांच्या मालमत्तेवर अनाधिकृतपणे ताबे करून त्या मालमत्ता बळकावल्या जात असल्याचं निवेदनात म्हटलंय. अश्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आळा घालण्यात यावा व बांधकाम व्यावसायिकांच्या संपत्तीवर होणारे अनाधिकृत ताबे रोखण्यात यावे. अशी मागणीही करण्यात आली. शिवाय गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर पोलीस प्रशासनाचा कुठलाच धाक राहिलेला नसल्याचंही निवेदनात म्हटलंय.