जालना तालुक्यातील मानेगाव येथील क्रांतीनगर पर्यत जाण्यासाठी तसेच क्रांतीनगर ते लालदेव फाटा येथे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने सोमवार दि. 22 जुलै 2024 रोजी दुपारी 12 वाजता गावकर्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जावून साखळी उपोषण करुन आंदोलन सुरु केलं. दरम्यान आंदोलनाची दखल घेत विविध राजकीय नेत्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलकांच्या भेटी घेऊन रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावण्याचं आश्वासन दिलंय. त्यामुळे सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलंय.
आंदोलकांनी आंदोलन सुरु केल्यानंतर जिल्हाधिकारी यांची भेट घेत निवेदन सादर केलं. गावकर्यांना जाण्यासाठी थोडाही रस्ता शिल्लक नाही, पायी चालणे देखील अवघड होत आहे. त्यामुळे हा रस्ता तात्काळ बनवून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलकांची दखल घेत आमदार कैलास गोरंट्याल यांनी आंदोलकांना भेटून रस्ता करुन देण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे हरिष रत्नपारखे यांनी आंदोलकात बसून त्यांच्या मागण्यांना पाठींबा जाहिर केला. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य पांडमामा पोहेकर यांनी भेट घेत आपण आंदोलकासोबत असून रस्ता करुन देण्याची मागणी केली. त्यानंतर माजी आमदार तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी देखील भेट देत आंदोलन कर्त्यांची मागणी पुर्ण करण्याचं आश्वासन दिलं. यावेळी आण्णासाहेब चित्तेकर, सरपंच संतोष ढेंगळे यांची उपस्थिती होती. दरम्यान रिपब्लीनक पार्टी ऑफ इंडीयाचे प्रदेश सचिव अॅड. ब्रम्हाणंद चव्हाण यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन रस्त्याचं काम तात्काळ मार्गी लावण्याची मागणी केली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे भानुदास साळवे, विलास नरवडे, गौतम वाघमारे, राजरत्न आचलखांब यांनी देखील निवेदन देत पाठींबा दिला.