केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात सोने आणि चांदीच्या सीमा शुल्कात मोठी घट केली आहे. केंद्र सरकारने 15 टक्क्यांवर असलेले सीमा शुल्क 6 टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे आजपासूनच सोने-चांदीच्या भावांमध्ये मोठी घसरण झाली आहे. सोने-चांदीचे सीमा शुल्क कमी झाल्याने सर्वसामान्यांना मोठा फायदा आणि दिलासा मिळणार आहे.
विशेष म्हणजे देशाच्या अर्थसंकल्पात सोन्या आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 6 टक्क्यांनी कमी केल्याची घोषणा झाल्यामुळे जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्या-चांदीचे दर घरसले आहेत. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात 3 हजार रुपयांनी तर चांदीच्या दरातही 3 हजार रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचे दर 73 हजार रुपयांवरून 70 हजार रुपयांवर आले आहेत. तर चांदीचे दर हे 90 हजार रुपयांवरून 87 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दारात चढ-उतार होत असल्याने सराफ व्यावसायिक तसेच ग्राहक संभ्रमात होते. मात्र आता तब्बल 3 हजार रुपयांनी सोन्याने आणि चांदीचे दर कमी झाल्यामुळे त्याचा ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
आगामी काळात सण-उत्सव असल्याने सोने आणि चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. देशाचा अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आल्याची घोषणा झाल्याने त्याचा जळगावच्या सराफ बाजारात परिणाम झाला आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोने-चांदी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांकडून आनंद व्यक्त केला जातोय.
मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर काल प्रती 10 ग्रॅम किंवा 1 तोळे सोन्याचा दर हा 67 हजार 700 रुपये इतका होता. पण आता हाच दर 64 हजार 950 रुपयांवर आला आहे. विशेष म्हणजे मुंबईत काल 1 ग्रॅम सोन्याचा दर हा 6770 रुपये इतका होता. पण आज तोच दर 6495 रुपये इतका झाला आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर हा कालपर्यंत 7385 रुपये प्रतीग्रॅम होता. तोच दर आझ 7086 वर आला आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा कालचा दर हा 73,850 इतका होता. आता तोच दर 70,860 वर आला आहे. जवळपास 2990 रुपयांची घसरण झालेली बघायला मिळत आहे.
देशाची राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर हा काल 1 ग्रॅम सोने हे 6785 रुपये इतकं होतं. पण त्याची किंमत आज 6510 इतकी झाली आहे. तर 1 तोळे सोन्याची किंमत ही 67,850 इतकी होती, तीच किंमत आज 65,100 रुपयांवर आली आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर हा काल प्रती तोळे 74 हजार रुपये इतका होता. हाच दर आज 71,010 वर आला आहे.