जालना जिल्ह्यातील वृध्द लोककलावंत समितीची बैठक होत नसल्याने अनेक लोककलावंत मानधनापासून वंचित आहेत. त्यामुळे लोककलावंत समितीची तात्काळ बैठक घेण्यात यावी आणि वृध्द लोककलावंताचे प्रश्न सोडविण्यात यावेत या मागणीसाठी सोमवार दि. 22 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजेपासून वाजत-गाजत आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. यावेळी लोककलावंतानी वाद्याच्या साथीसह गीतगायन करुन अनेकांचे लक्ष आंदोलनाकडे लक्ष वेधून घेतलं.
वृध्द लोककलावंत मानधन निवड समितीची बैठक हेतुपुरस्सर घेण्यास टाळाटाळ करण्यात आहे. त्यामुळे लोककलावंतानी आजपासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरु केलंय. परंतु, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी श्रीमती भोजने यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांना बैठक घेण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळे आंदोलकांनी देखील त्यांचं आंदोलन मागे घेतलंय. यावेळी लोककलावंत राम घोडके, नारायण वाघमारे, अनिल गायकवाड, मनोहर खोजे, नारायण कुलकर्णी, रामभाऊ लोखंडे, गोदावरी सोळुंके, रुख्मीनी घोडके, ज्ञानेश्वर जगताप, विजय मघाडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.