मुंबई : वरळीतील स्पामध्ये हत्या झालेल्या गुरुसिद्धप्पा वाघमारेच्या हत्येचं गूढ अखेर उकललं आहे. खंडणीच्या त्रासाला कंटाळून दोन स्पा मालकांकडून सहा लाखांची सुपारी देऊन गुरुसिद्धप्पा वाघमारेची हत्या केल्याचं समोर आले आहे. मात्र या हत्या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला आहे. हत्या झालेल्या गुरू वाघमारेच्या दोन्ही मांड्यावर तब्बल 22 नाव गोंदवली आहेत. माझ्या जीवितास काही बरेवाईट झाल्यास हे लोक जबाबदार असतील असं म्हणून चक्क ही नावे गोंदवली आहेत. पोलिसांकडून या 22 लोकांची चौकशी होणार आहे.
वरळीतील स्पामध्ये हत्या झालेल्या गुरु वाघमारे हत्या प्रकरणात मोठे खुलासे होत आहे. दरमहा द्याव्या लागणाऱ्या खंडणीला वैतागून गुरुच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान गुरुसिद्धप्पाच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेकडून तीन आरोपी तर वरळी पोलिसांकडून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुरू वाघमारे हा स्पा मालकांना खंडणीसाठी दर महिन्याला त्रास देत होता. गुरूकडून अनेक स्पा मालकांना ब्लॅकमेल केल्याच्या आणि त्रास दिल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. ज्या स्पामध्ये हत्या झाली त्या स्पाच्या मालकाकडून वाघमारे आठ ते दहा वर्षापासून खंडणी घेत होता. दरमहा द्याव्या लागणाऱ्या खंडणीला वैतागून हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे.
दोन्ही मांड्यावर गोंदवली गजनी स्टाईलने 22 नावे
या प्रकरणात सर्वात मोठी ट्वीस्ट म्हणजे आपले शत्रू कधीतरी तरी आपला काटा काढतील अशी शंका कदाचीत गुरूला होती. त्यामुळेच त्याने चक्क आपल्या शत्रूंची नावे आपल्या दोन्ही मांड्यावर गोंदवली होती. माझ्या जीवितास काही बरेवाईट झाल्यास हे लोक जबाबदार असतील असे देखील लिहिले. स्वरूपात लिहून ठेवली होती. त्यामध्ये हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या व्यक्तीचही नाव आहे.माझ्या दुश्मनांची नावे डायरीत नोंद आहेत. चौकशी करून कारवाई करावी असेही वाघमारेने स्वतःच्या मांडीवर गोंदवले आहे. या 22 नावांमध्ये स्वतःच्याच कुटुंबातील दोन सदस्यांची नाव असल्याचे समोर आले आहे.
नालासोपारामधून एकाला आणि कोटामधून दोन जणांना अटक
हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने नालासोपारामधून एकाला आणि राजस्थानच्या कोटा मधून दोन आरोपींना अटक केली आहे. वरळी पोलिसांनीही स्पा च्या मालकाला अटक केलेली आहे. परवा रात्री वरळीच्या स्पा मध्ये रात्री एक वाजता वाघमारेची चाकूने हत्या केल्याचं समोर आलं होतं. मुंबई पोलिसांकडून आणखी काही लोकांची यामध्ये चौकशी सुरू आहे.
गुरुला या अगोदर देखील मारण्याचा प्रयत्न
वरळीच्या स्पामध्ये हत्या झालेल्या गुरुसिद्धप्पा वाघमारेचा नवा कारनामा समोर आला आहे. स्पा मालकांकडून खंडणी उकळणाऱ्या गुरुसिद्धप्पाने मांडीवर आपल्या दुश्मनांची नावं गोंदवली होती..नावं गोंदवलेल्या यादीत गुरुसिद्धप्पाच्या खुनाची सुपारी दिलेला स्पा मालक संतोष शेरेकरचंही नाव गोंदवण्यात आलं होते. खंडणीखोर गुरुसिद्धप्पा वाघमारेला संतोष शेरेकरकडून याआधीही अनेकवेळा मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.