शिर्डी : साई संस्थान विरोधात शिर्डी ग्रामस्थांकडून भव्य मोर्चा काढण्यात आला. मंदिराचे चारही प्रवेशद्वार खुले करा, साई मंदिराबाबत कुठलाही निर्णय करताना ग्रामस्थांना विश्वासात घ्या, यासह विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात आले. या मोर्चात ग्रामस्थ आणि शिर्डीतील व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
साई मंदिर परिसराचे गेट पुर्वीप्रमाणे आत-बाहेर जाण्यासाठी खुले करावे. तसेच मंदिर सुरक्षेसाठी सीआयएसएफ नियुक्त करताना संस्थान प्रशासनाने ग्रामस्थांच्या भावना त्यासाठी नियुक्त केलेल्या समितीसमोर ठामपणे मांडाव्यात, त्या समितीत स्थानिक लोकप्रतिनीधींचाही समावेश असावा, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी ग्रामस्थांकडून याआधी आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा मोर्चा काढण्यात आला.
यावेळी साई मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारांना हार घालत ग्रामस्थांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोन दिवसापूर्वी शिर्डी ग्रामस्थांच्या एका गटाने साई संस्थान विरोधात मोर्चा काढला होता. या पाठोपाठ आज दुसऱ्या गटाकडून देखील साई संस्थान विरोधात भव्य मोर्चा काढत जोरदार आंदोलन करण्यात आले. त्यामुळे शिर्डीत ग्रामस्थांची गटबाजी समोर आली आहे.
साईबाबा मंदिराचे चारही प्रवेशद्वार खुले करणे. चारही प्रवेशद्वाराजवळ मोबाईल आणि चप्पल स्टॅन्ड असावे. चारही प्रवेशद्वाराजवळ सशुल्क दर्शन व्यवस्था असावी. साई संस्थान प्रशासनाने साईमंदिरा बाबत कुठलाही निर्णय करताना ग्रामस्थांना विश्वासात घ्यावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
दरम्यान, संस्थान प्रशासनाने सुरक्षेच्या नावाखाली प्रवेशद्वारांवर निर्बंध घातल्याने भाविक व ग्रामस्थांचा एक प्रकारे छळ सुरू आहे. मंदिर परिसरातील ग्रामदैवतांच्या दर्शनाला जाणेही अवघड आहे. या निर्बंधामुळे शहरातील पश्चिम भाग वगळता सर्व बाजुंचे व्यवसाय पूर्णपणे संपले आहेत. त्यामुळे हे गेट तत्काळ खुले करावे. वृद्ध, अपंग भाविकांना मोठा फेरफटका मारायला लावण्याऐवजी सर्व द्वारांमधून आत-बाहेर जाता यावे, प्रवेशद्वारावर व्हील चेअर, चप्पल, मोबाईल स्टॅन्डची सुविधा असावी, अशी मागणी बुधवारी झालेल्या मोर्चातून करण्यात आली होती. एकाच प्रश्नासाठी शिर्डीतील ग्रामस्थांमध्ये दोन वेगवेगळ्या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्यामुळे या दोन्ही गटाच्या श्रेयवाद लढ्याची चर्चा शिर्डीत चांगली रंगली आहे.