उरण – यशश्री शिंदे या तरुणीच्या हत्येच्या निषेधार्थ आज उरण बंदची हाक देण्यात आली आहे. यशश्रीच्या मारेकऱ्यांना शोधण्यात पोलिसांना अपयश आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या तरुणीच्या मारेकऱ्यांना शोधावं म्हणून आज स्थानिक नागरिक लाँग मार्च काढणार आहेत. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आज सकाळी 10 वाजता फुल मार्केट येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळून हा लाँगमार्च निघणार आहे. या लाँगमार्चमध्ये शेकडो नागरिक सामील होणार आहेत. महिला या लाँगमार्चमध्ये मोठ्याप्रमाणावर उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. यशश्री शिंदेच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी हा लाँगमार्च काढण्यात येत आहे. तर, दुसरीकडे पोलिसांचं एक पथक कर्नाटकाला गेलं असून आरोपीचा शोध घेत आहेत.
यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीचा रायगड जिल्ह्याच्या उरणमध्ये हत्या झाली होती. शुक्रवारी रात्री उरण-पनवेल रेल्वे मार्गालगत तिचा मृतदेह सापडला होता. तिचे अवयव कापून ही हत्या करण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. यशश्रीवर अंत्यसंस्कारही करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. या घटनेनंतर उरणमधील बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज उरण बंदची हाक देण्यात आली आहे.
यशश्रीची हत्या लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा कुटुंबीयांचं म्हणणं आहे. दाऊद शेख नावाच्या व्यक्तीने ही हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. त्या दिवशी यशश्री सकाळी 11 वाजता मैत्रीणीकडे गेली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. थेट तिचा मृतदेहच उरण रेल्वे स्टेशनजवळ सापडला असल्याचं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. ती बेलापूरला नोकरीला होती. हाफडे घेऊन ती कामावरून लवकर निघाली होती, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी तीन पथके स्थापन केली आहे. एक पथक कर्नाटकात गेलं आहे.