कोपरगाव : नदीपात्रात असणाऱ्या मोटारी काढण्यासाठी गेलेले तीन तरुण नदीत वाहून गेले. मात्र जवळच असलेल्या पवार दाम्पत्याने हे पाहिलं आणि ताईबाई पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या अंगावरील साडी काढत दोन्ही मुलांच्या दिशेने फेकली. त्यातील दोन मुलांना वाचवण्यात यश मिळवलं. मात्र, या घटनेत एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ताईबाई पवार व तिच्या नवऱ्याने दाखवलेल्या धाडसाचं आता सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यानंतर अनेक धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दारणा धरणातून पाण्याची आवक होत असल्याने गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं. पाणी सोडल्याचे कळताच कोपरगाव तालुक्यातील हंडेवाडी -मंजूर येथील गोदावरी नदीवरील कोल्हापूर टाईपचा मंजूर बंधारा असून या पुलाजवळ शेतकरी संतोष भिमाशंकर तांगतोडे (25), अमोल भिमाशंकर तांगतोडे (30), प्रदिप भिमाशंकर तांगतोडे (28) व नारायण भिकाजी तांगतोडे (52) हे नदी किनारी मोटारी काढण्यासाठी गेले.
अंगावरील साडी नदीत फेकत वाचवला दोघांचा जीव
मात्र अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने तीन जण पाण्यात वाहून जाऊ लागले. गोदावरी नदीकिनारी असलेल्या ताईबाई आणि छबुराव पवार या दोघांनी ही घटना पाहिली आणि त्यांनी या युवकांना वाचवण्यासाठी सुरुवात केली. तिघांना वाचवण्यासाठी जवळ काही नसल्यामुळे ताईबाई पवार यांनी आपल्या अंगावरील साडी काढत या तरुणांच्या दिशेने फेकली. या साडीचा आधार मिळाल्याने यातील दोघांचे प्राण वाचले आहेत. ताराबाई पवार व तिच्या नवऱ्याने दाखवलेल्या धाडसाचं आता सर्वत्र कौतुक होत आहे.
एकाचा मृतदेह सापडला
दोन जणांवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून तब्येत बरी असल्याचे सांगितले जात आहे. संतोष तांगतोडे या युवकाचा शोध प्रशासनाकडून घेतला जात होता. त्यानंतर प्रशासनाच्या सहकार्याने पोहणाऱ्या तरुणांनी काल सायंकाळी उशिरापर्यंत शोधकार्य सुरू केले. मात्र, सायंकाळपर्यंत शोध लागू शकला नसल्याने दुसऱ्या दिवशी देखील बोटीच्याद्वारे शोधमोहीम सुरु असताना मृतदेह नदीपात्रात आढळून आला. तरुणाच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबासाह मंजूर गावामध्ये शोककळा पसरली आहे.