जालना तालुक्यातील बिस्कीट कंपनी ते हॉटेल लंका दरम्यान दोन हुल्लडबाज तरुणांनी हवेत गोळीबार केल्याची चर्चा आज सकाळपासून सुरु झाली होती. त्या अनुषंगाने एक मेसेज देखील सोशल मिडीयावर फिरत होता. त्यावर मौजपुरी पोलीसांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा खुलासा केलाय. दोन तरणांनी छत्रपती संभाजीनगर येथून एअर गन आणल्या होत्या. त्या जप्त केल्या असून तरुणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती देखील सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांनी रविवार दि. 28 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता दिलीय.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मौजपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील दोन तरुण संभाजीनगर येथे पिस्टल आणण्यासाठी गेले असल्याची गोपनीय माहिती पोलीसांना मिळाली होती. या गोपनीय माहितीवरून मंठा चौफुली ते रामनगर रोडवर सापळा लावण्यात आला होता. पोलीसांनी त्यांचा पाठलाग सुरु केला आणि दोन्ही तरुणांना रामनगर येथे ताब्यात घेण्यात आले. सदर तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या झडतीमध्ये त्यांच्याकडे बंदूक घर या दुकानातून खरेदी केलेले साधे एअरगन मिळून आले. या प्रकरणी दोन्ही तरुणांना पोलीस चौकी येथे आणून त्यांच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली. एअरगन व्यतीरिक्त त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे अग्निशास्त्र सापडून आले नाही. सदरील एअरगन जप्त करण्यात आली असून दोन्ही तरुणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांनी दिलीय.