गेल्या काही दिवसांपासून राज्यात सातत्याने हिट अँड रनच्या घटना घडताना दिसत आहे. मुंबईतील वरळी परिसरात घडलेली हिट अँड रनची घटना ताजी असतानाच आता आणखी एक हिट अँड रनचा प्रकार समोर आला आहे. वरळीत पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. वरळीत एका भरधाव बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. विनोद लाड (28) असे या तरुणाचे नाव आहे.
मुंबईतील वरळी परिसरात शनिवारी 20 जुलै रोजी एक भीषण अपघात घडला. वांद्रे वरळी सी लिंक जवळ असलेल्या अब्दुल गफार खान मार्गावर एका बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला मागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी चालवत असलेला विनोद लाड जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तो कोमात गेला. विनोदवर नायर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या विनोद लाड या तरुणाचा सात दिवसांनी मृत्यू झाला. उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी कार चालक किरण इंदुलकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही बीएमडब्ल्यू गाडी ठाण्यातील प्रसिद्ध अत्तर व्यावसायिकाची असल्याची माहिती समोर येत आहे.
विनोद लाड हा मूळ मालवणमधील रहिवाशी होता. तो ठाण्यातील एका ट्रान्सपोर्ट कंपनीत पर्यवेक्षक पदावर काम करत होता. वरळीत एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्ताने तो ठाण्यातून वरळीत आला होता. याप्रकरणी विनोदचा चुलत भाऊ किशोर लाड याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या अपघातावेळी किरण इंदुलकर हा गाडी चालवत होता, असे त्याने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून सध्या याचा तपास सुरु आहे.
दरम्यान याआधीही वरळीत हिट अँड रनची घटना घडली होती. वरळीत 9 जुलै रोजी मुंबईतील वरळी भागातच भरधाव बीएमडब्ल्यू कारने धडक दिल्यामुळे महिलेला प्राण गमवावे लागले होते. या कारने दुचाकीवर असलेल्या नाखवा दाम्पत्याला उडवले होते. त्यानंतर जखमी झालेल्या कावेरी नाखवा यांना गाडीने काही अंतरापर्यंत फरफटत नेले होते. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला होता, तर त्यांचे पती जखमी झाले होते. वरळीत अपघात झालेली ती बीएमडब्ल्यू कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उपनेते असलेल्या राजेश शाह यांची होती. अपघातावेळी शाह यांचा मुलगा मिहिर शाह दारु पिऊन कार चालवत होता.