नवी मुंबई – खारघर येथील एका सराफा दुकानात मोठा दरोडा टाकण्यात आलाय. या दरोड्यात लाखोंचे दागिने लुटण्यात आले आहेत. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून हा दरोडा टाकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एम बी ज्वेलर्स असे दरोडा टाकण्यात आलेल्या सराफा दुकानाचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ आहे. तिघांनी मिळून हा दरोडा टाकला असून ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार खारघर येथील बी एम ज्वेलर्स या सराफा दुकानात दरोडा टाकण्यात आला आहे. दरोडेखोरांनी दुकानातील सोने-चांदीचे अनेक दागिने लंपास केले आहेत. एकूण तिघांनी हा दरोडा टाकला असून त्यांच्याजवळ पिस्तुल होते. या दरोड्यात त्यांनी लाखो रुपयांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने लंपास केले आहेत. घारघर येथील सेक्टर 30 मध्ये बी एम ज्वलर्स नावाचे हे दुकान आहे.
दरोडेखोरांनी ज्या पद्धतीने ही लूट केली आहे, त्यानुसार ते गेल्या कित्येक दिवसांपासून दरोड्याचे नियोजन करत असावेत, असा अंदाज लावला जात आहे. इतरांना चेहरा दिसू नये तसेच सीसीटीव्हीत चेहरा कैद होऊ नये म्हणून या दरोडेखोरांनी डोक्यावर हेल्मेट लावले होते. त्यांच्या हातात पिस्तुल होते. हेल्मेटसह ते सराफा दुकानात घुसले. विशेष म्हणजे लूटमार केल्यानंतर त्यांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर खारघर या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या भागात असणाऱ्या सराफा व्यापाऱ्यांत सध्या तणावाची स्थिती आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास चालू केला असून आरोपींचा शोध घेतला जातोय. लवकरच दरोडेखोरांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.