शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट करावी, यासाठी मराठा कार्यकर्त्यांकडून आज मातोश्रीबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे. आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सरकार मराठा आरक्षणाबद्दल जी भूमिका घेईल, त्याला आमचा पाठिंबा असेल, असे मराठा आंदोलकांना सांगितले.
ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्याबद्दलच्या मागणीबद्दल उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मराठा समाजातील कार्यकर्त्यांकडून होत आहे. याबद्दल आज मातोश्रीबाहेर आंदोलन केले जात आहे. आता नुकतंच अंबादास दानवे यांनी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे प्रमुख रमेश केरे पाटील यांची भेट घेतली. यावेळी अंबादास दानवेंनी रमेश केरे पाटील यांना तुम्ही उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ घेऊन यायला हवं. त्यांची तब्येत कशी आहे, ते कसे आहेत, याबद्दल चौकशी करुन तुम्ही भेटीसाठी यायला हवं, असे म्हटले.
आम्ही आमची भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. सरकार मराठा आरक्षणाबद्दल जी भूमिका घेईल, त्याला आमचा पाठिंबा असेल. तुम्हाला जे काही बोलायचं असेल तर तुम्ही चार पाच जणांचे शिष्टमंडळ घेऊन या. आपण याबद्दल बोलू. तुम्ही एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जायला हवं. इकडे येऊन काय होणार आहे? थोडा वेळ थांबा, मी आत जाऊन साहेबांना विचारतो. त्यानंतर तुम्ही चार ते पाच जण आत या आणि शांततेत चर्चा करा, असे आश्वासन अंबादास दानवे यांनी मातोश्रीबाहेर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिले.
“आम्ही सर्वपक्षीय नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करणार आहोत. याची सुरुवात आम्ही आज मातोश्रीपासून करत आहोत. मराठा क्रांती ठोक मोर्चा म्हणून आम्ही एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर अनेक आंदोलन केली आहेत. सध्या सर्वच पक्षाचे नेते उडवाउडवीची उत्तर देत आहेत. यांना मराठा आरक्षणाबद्दल कोणतीही ठाम भूमिका घ्यायची नाही, म्हणून हे सर्व सुरु आहे. उद्धव ठाकरेंनी भेट दिली नाही किंवा निवदेन स्वीकारलं नाही, तर आम्ही इथेच बसून राहू. पोलिसांनी आम्हाला अटक केली तरीही चालेल”, असे रमेश केरे पाटील यांनी म्हटले.