रील्स बनवताना एका ट्रॅव्हल ब्लॉगर तरूणीचा ३०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ताजी असतानाही तरूण-तरूणींच्या डोक्यावरील रील्सचं वेड काही ओसरताना दिसत नाहीये. कारण रील्सच्या वेडामुळे अमरावतीमध्य़े आणखी एक भयानक दुर्घटना घडली आहे.
रिल्स बनवताना तरूण-तरुणी 100 फूट खोल खाणीत पडल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीजवळ घडला आहे. अमरावती शहराजवळच्या मासोद मधील गिट्टी खदान मध्ये ही दुर्घटना घडली आहे. खाणीत पडल्याने तरूण-तरूणी दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते दोघेही अवघे 17-18 वर्षांचे असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. गिट्टी खंदान मधील उत्खनन पूर्ण झाल्याने मोठा खड्डा पडला आहे. तेथे तरुणी रिल्स करत होती तर तरुण तिचे रिल्स शूट करत होता. मात्र यावेळी तरूणीचा तोल गेला आणि १०० फूट खोल खाणीत कोसळली. तर तिला वाचवण्याच्या नादात तो तरूणही खाली कोसळला आणि दोघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर पोलिस आणि बचाव पथकाचे कर्मचारी तेथे दाखल झाले आणि अतक प्रयत्नांनंतर रात्री साडेआठच्या सुमारास त्या दोघांना खाणीतून बाहेर काढण्यात यश आलं.
खाणीत पडलेला तरूण शहरातील वडाळी परिसरातील रहिवासी आहे. रविवारी संध्याकाळी ते मासोद परिसरात गेला. तेथील सुमारे १०० फूट खोल असलेल्या व अनेक एकर क्षेत्रात पसरलेल्या मोठ्या खदानीच्या वर हे तरूण-तरूणी रिल्स तयार करत होते. सदर तरूणी अभिनय करत होती तर मुलगा तिचे शूटिंग करत होता. मात्र ॲक्टिंगच्या नादात ती मुलगी थेट खाणीत पडली. शूटिंग करणाऱ्या त्या तरूणाने तिला वाचवण्यासाठी धाव घेतली मात्रर तोही खाणीत पडून जखमी झाला.
अनेक फूटांवरून पडल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. मुलगा तर बेशुद्धच झाला. त्या मुलीने बचावासाठी आरडाओरडा सुरू केला, पण बराच वेळ कोणीच मदतीसाठी आलं नाही. तेथे फार वर्दळ नसल्याने कोणाला याबाबत कळलं नाही. काही वेळाने खदानीच्या परिसरातील एका व्यक्तीला त्या मुलीचा आवाज ऐकू आला आणि त्याने तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
पोलिस व बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत बचावमोहिम सुरू केली. बऱ्याच काळानंतर अखेर त्या तरूण-तरूणीला बाहेर काढण्यात यश आले. दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.