जालना तालुक्यातील मौजपुरी पोलीसांनी दमदार कारवाई करुन मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरणारी टोळी जेरबंद केली असल्याची माहिती मंगळवार दि. 6 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 4 वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांनी दिलीय.
या कारवाईत सुमारे 8 गुन्हे उघडकीस आणले असून त्यांच्या ताब्यातून 19 बॅटर्यासह सुमारे 10 लाख 5 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
जालना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल टॉवरच्या बॅटरीच्या चोरीचे प्रकार घडत असल्याने पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल आणि अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी सदरील गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मौजपुरी पोलीसांनी गस्त वाढवून आरोपीचा शोध सुरु केला. दरम्यान दि. 31 जुलै 2024 रोजी रात्रीच्या सुमारास सहाय्यक फौजदार प्रकाश जाधव, पोलीस अंमलदार शैलेंद्र आडेकर व चालक धोंडीराम वाघमारे हे जालना ते मंठा हायवे रोडने गस्त घालीत होते. त्यावेळी रोडलगत असलेल्या सोलगव्हाण पाटीजवळील धानोरा शिवारातील एअरटेल कंपनीच्या मोबाईल टॉवर जवळ काही इसमाच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यामुळे पोलीसांनी त्यांचा पाठलाग करुन अलीम उर्फ गुड्डु शेख खाजा, शेख हसन शेख मोहसीन, रा. वडजी ता. रिसोड जि. वाशीम ह.मु. चिकलठाणा जि.छ. संभाजीनगर, शुभम अशोक फतरे, राहुल उर्फ सुनील संजय मेहेर रा. चिकलठाणा छ. संभाजीनगर यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून ईरटीगा वाहन क्रमांक एम.एच 04 जि.डी.3526 सह 10 बॅटर्या रोख रक्कम असा एकूण 10 लाख 5 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त करण्यात आलाय. चोरीच्या बॅटरी विकत घेणारे नवाब ईमाम शहा, मोहम्मद अमीरोद्दीन अब्दुल गफ्फार यांना देखील अटक करण्यात आली. यामध्ये मौजपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3 गुन्हे, परतुर पोलीस ठाणे हद्दीतील 1, जाफराबाद पोलीस ठाणे हद्दीतील 2, अजिंठा पोलीस ठाणे हद्दीतील 1 आणि दौलताबाद पोलीस ठाणे हद्दीतील 1 असे एकूण आठ गुन्हे उघडकीस आणलेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोउपनि राकेश नेटके, सहाय्यक फौजदार प्रकाश जाधव, संतोष धायडे, ज्ञानोबा बिरादार, पोहेकॉ मच्छिद्र वाघ, राजेंद्र देशमुख, दिलीप गोडबोले, नितीन खरात, नामदेव जाधव, भगवान खरात, दादासाहेब हरणे, पो.ना. नितीन कोकणे, धोंडीराम वाघमारे, शैलेंद्र आडेकर, प्रदिप पाचरणे, अविनाश मांटे, प्रशांत म्हस्के, सदाशिव खैरे, विनोद इंगळे यांनी केलीय.