जालना शहर महानगर पालिकेचा प्रथम वर्धापन दिन बुधवार दि. 7 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6 वाजता महास्वच्छता अभियानाने साजरा करण्यात आला. यावेळी जालना शहर महानगरपालिका, रोटरी क्लब ऑफ जालना, कुंडलिका सीना फाऊंडेशन सह विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला होता.
जालना शहर महानगरपालिकेच्या प्रथम वर्धापन दिनाचे तसेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दि. 7 ऑगस्ट 2024 ते 14 ऑगस्ट 2024 दरम्यान रोज सकाळी 6 ते 9 या वेळेत महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
हे अभियान म्हणजे एक सकारात्मक सुरूवात असून यापुढेही आपल्या जालना शहराला एक स्वच्छ महानगर म्हणून ओळख निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. महास्वच्छता अभियान राबण्यासाठी नोडल अधिकार्यांसह सहकर्मचार्यांच्या नेमणुका करण्यात आल्यात. त्यासाठी वार्डनिहाय नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार 7 ऑगस्ट रोजी भोकरदन नाका ते भास्करराव दानवे यांचे घर, भोकरदन नाका ते राजुरी कॉर्नर व्हाया मुंडे चौक, भोकरदन नाका ते विशाल कॉर्नर दरम्यान स्वच्छता रॅली काढून स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे.
यावेळी उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या कलापथकाने विविध विषयावर गीताच्या माध्यमातून जनजागृती केली. स्वच्छता, ओला कचरा, सुका कचरा, झाडे लावा, झाडे जगवा, वायु प्रदुषण कमी करणे, कचरा कमी करणे, कचर्यापासुन पुनर्वापर करणे, टाकावू पासून टीकावू वस्तू तयार करणे, नळाला तोटी लावणे, पाण्याची काळजी कशी घ्यावी, नालीत कचरा न टाकता घंटागाडीतच कचरा टाकणे आदी विषयावर जनजागृती करण्यात आली.
या मोहिमेत शहर महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, उपायुक्त नंदा गायकवाड, केशव कानपुडे, रोटरी क्लब जालनाचे अध्यक्ष डॉ. दीपक बगडिया, सचिव रवी भक्कड, प्रकल्प प्रमुख सुरेंद्र पित्ती, वर्षा पित्ती, उदय शिंदे, हेमंतभाई ठक्कर, अनया अग्रवाल, अच्युत मोरे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते.