मराठा आरक्षणावरून राज्यभरात रान पेटलेलं असतांना महाविकास आघाडीतील घटक असलेल्या शरद पवार आणि नाना पटोले यांनी मराठा आरक्षणावरील त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी राज्यभरात ठिकठिकाणी मराठा आरक्षण आंदोलकांनी आता केलीय. त्याचा परिणाम म्हणून कुर्डूवाडी येथे मराठा आंदोलकांनी शरद पवार यांची गाडी अडवून त्यांना आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली. तिथेही शरद पवारांनी काहीही उत्तर दिलं नाही, तर पुढे बार्शी येथील त्यांच्या सभेत त्यांना काळे झेंडे दाखवून आरक्षणावर घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शरद पवारांनी आपलं भाषण सुरूच ठेऊन या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष केलय. त्यामुळं संतप्त मराठा युवकाने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मराठा तरुणाचे प्राण वाचवण्यात आले.
शिवाय नाना पटोले नांदेड येथे आले असताना मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावे की, नाही याबाबत काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करत सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी नांदेडमध्ये काँगेसच्या बैठकीत जोरदार घोषणाबाजी केली. संभ्रम निर्माण करणारी विधाने करून, सर्व समाजांची दिशाभूल करणे काँग्रेसने थांबवावे असा इशारा आंदोलकांनी काँग्रेसला दिला आहे. तर उद्धव ठाकरेंनी देखील आरक्षणावर आपली भूमिका अजून स्पष्ट केली नाही. ते आघाडी सरकारचे मुख्यमंत्री राहिलेेत. त्यांच्याच काळात मराठा समाजाचं आरक्षण त्यांच्या चुकीच्या भूमिकेमुळं कोर्टात टिकू शकलं नव्हतं.
संतप्त आंदोलकांचं म्हणणं होतं की, लोकसभेत मराठा समाज त्यांच्या मागे उभा राहिला, परंतु, निवडणुकीनंतर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि त्यांनी आपली भूमिका अजून स्पष्ट केली नाही, उलट निवडणुकीत मते मिळवण्यासाठी महाविकास आघाडीने मराठा समाजाचा वापर केला, निवडणूक जवळ आली म्हणजे जातीजातींमध्ये आरक्षणावरून वाद पेटवून आपली पोळी भाजून घेण्याचा महाविकास आघाडीचा खेळ मराठा समाजाने ओळखलाय. आघाडी विरोधात मराठा समाजात तीव्र असंतोष पसरतोय. अशी परिस्थिती सध्या राज्यभरात निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळतंय.