राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे गेल्या दोन दिवसांपासून खात्यात जमा होऊ लागले आहेत. आज तर जवळपास सर्वच महिलांच्या खात्यात हे पैसे गेले आहेत. रक्षाबंधनाच्या पूर्वीच हे पैसे खात्यात आल्याने खेड्यापाड्यातील महिलांमध्ये आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे. पण काही ठिकाणी अनेक महिला हिरमुसल्या आहेत. कारण या महिलांच्या अकाऊंटवर 3 हजार रुपये येण्याऐवजी 500 ते एक हजार रुपयेच आले आहेत. त्यामुळे या महिलांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
राज्य सरकारने लाडक्या बहिणीची ओवाळणीचे 3 हजार रुपये खात्यात जमा केले, पण मिनिमम बॅलन्सच्या (कमीत कमी जमा) नावाखाली बँकेने दंड वसूल केल्याने महिलांच्या हाती अवघे 500 ते 1 हजार रुपये आले आहेत. त्यामुळे महिला खट्टु झाल्या आहेत. खात्यात जमा झालेल्या 3 हजारांपैकी फक्त 500 ते हजार रुपयेच हातात आल्याने महिला खातेदार हैराण झाल्या आहेत. बाकीची रक्कम कुठे गायब झाली? असा सवाल या महिला करत आहेत.
बँकवाल्यांनी आमचे पैसे खाल्ले, असा आरोप या महिला करत होत्या. त्यावर खात्यात कमीत कमी जेवढी रक्कम पाहिजे तेवढी नसल्याने तुम्हाला दंड लागला आणि ती रक्कम सिस्टिमने कापली असं बँकेकडून सांगितलं जात आहे. मात्र, हुज्जत घालण्यात काही अर्थ नसल्याने अनेक महिला नाराज होऊनच घरी परतल्या आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ मिळण्याला सुरुवात झाली आहे. मात्र, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याने अनेक महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. आपल्याही खात्यात पैसे यावेत म्हणून या महिलांनी बँकेत आधार लिंक करण्यासाठी प्रचंड गर्दी केली आहे. नंदूरबारमध्ये तर आज बँकांमध्ये महिलांची गर्दीच गर्दी दिसली होती. एकीकडे बँकेत पैसे काढण्याची गर्दी आहे तर दुसरीकडे आधार कार्ड बँकेची लिंक करण्याची गर्दी होत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून सकाळपासून या महिला रांगेत उभ्या आहेत. मात्र आधार लिंक करण्यासाठी तासून तास उभं राहावं लागत असल्याची परिस्थिती लाभार्थ्यांवर आली आहे.