कुंभारी:- झाडे लावणे त्यासोबतच झाडे जगवणे ही सध्या काळाची गरज बनली आहे. त्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डीचे सरपंच महेश पाटील यांनी अनोखा उपक्रम सुरू केला आहे. गावातील प्रत्येक घरापुढे एक आंब्याचे झाड व एक सावली देणारे झाड अशी एक हजार झाडे लावली आहेत. झाडे जगवेल त्यांना घरपट्टी माफ अशी घोषणा सरपंच पाटील यांनी केली. अशा प्रकारच्या योजनेसाठी पुढाकार घेणारे हे एकमेव गाव असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा कार्यक्रम गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला
विविध आगळ्यावेगळ्या उपक्रमासाठी नावाजलेल्या दोड्डी गावातील प्रत्येक घरापुढे दोन झाड लावण्यात आले. यामध्ये गावातील प्रत्येकाचे योगदान असावे, यासाठी प्रत्येक घरापुढेलावलेल्या दोन्ही झाडांचे छायाचित्र काढण्यात आले आहे. पुढच्या वर्षी हे दोन्ही झाडे वाढलेले असल्यास झाडाचे जतन करणाऱ्या ग्रामस्थाला घरपट्टी माफ करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली यावेळी ग्रामपंचायतीकडून वृक्षसंरक्षक जाळ्या देण्यात आल्या. सरपंच पाटील यांनी कोरोना संसर्गाच्या काळात ग्रामस्थ तसेच नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. बाजार समिती बंद असल्याने भाजीपाल्याचे दर कोसळले होते. त्यावेळी त्यांनी स्वखर्चाने शेतातील भाजीपाला गावकऱ्यांना मोफत वाटले होते.
यावेळी उपसरपंच विशाल राठोड पोलीस पाटील चंद्रकांत पाटील, विविध विकास कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष सज्जन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पाटील, सविता हरनाळकर, सुनंदा होनमाने , ज्योती माने, बळी हेबळे, संजय मळगे, मानव संसाधन व्यक्ती वर्षा चौधरी, ग्रामसेवक संजय राठोड, संभाजी काळे युवा नेते, व्हॉइस चेअरमन नितीन बंडू व्हनपा रखे, देविदास माने सर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सगरे सर यांनी केले.