जालना – जालना विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विम्याचे अनुदान तात्काळ जमा करावे अशी मागणी आ. कैलास गोरंटयाल यांनी आज शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे केली आहे.
जालना विधानसभा मतदार संघातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाचे संरक्षण होण्यासाठी पीक विमा काढला आहे. मात्र, सन २०२२ – २३ मध्ये खरीप पिकांच्या विम्यापोटी तब्बल ७५ टक्के विमा अनुदान बाकी असून रब्बी पिकांचे शंभर टक्के अनुदान मिळालेले नाही. अगोदरच त्रस्त असलेला शेतकरी बांधव यावर्षी मागील दोन ते अडीच महिन्यात कमी प्रमाणात झालेल्या पाऊसामुळे शेतकऱ्यांच्या संकटात अधिकच भर पडण्याची भीती निर्माण झाली आहे. मागील वर्षी मोठया प्रमाणात झालेल्या पाऊसामुळे डाळिंब, द्राक्षाचे ट्रिगर मंजूर असून त्या बाबत देखील सकारात्मक पाऊल उचलावे असे आ. कैलास गोरंटयाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
मागील रब्बी, खरीप पिकांसह फळबागांच्या विम्याचे अनुदान शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावे अशी मागणी आ. कैलास गोरंटयाल यांनी यावेळी शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे केली आहे. दरम्यान, पिकविम्याच्या अनुदानाची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी यावेळी आ. गोरंटयाल यांच्यासह शिष्टमंडळाला दिली. या शिष्टमंडळात कृष्णा पडूळ, सोपान तिरुखे, माऊली इंगोले, अंजेभाऊ चव्हाण, विनोद यादव आदींचा समावेश होता.