जालना – शहरातील संभाजीनगर प्रभागात असलेल्या शांतिनिकेतन विद्यामंदिर या शाळेत संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या पुढाकाराने भयमुक्त विद्यार्थिनी या उपक्रमाचे आयोजन देशात व राज्यात सद्यस्थितीत घडणार्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सोमवार रोजी करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजीसभापती देवनाथ जाधव, शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकिवाले, दुर्गेश काठोटीवाले, सोनाजी पाटील यांची उपस्थिती होती.
या उपक्रमांतर्गत जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी शाळेत येऊन विद्यार्थिनींशी मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी उपस्थित मुलींना मार्गदर्शन करताना भारती म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत मुलींनी घाबरून जाऊ नये. गुंडप्रवृत्तीच्या व त्रास देणार्या लोकांचा प्रतिकार केला पाहिजे. तसेच आपणास दिलेल्या टोल नंबरवर संपर्क केल्यास ताबडतोब तुम्हाला मदत मिळेल. समाजातील सर्वच घटक हे वाईट नाही तर अनेक नागरिक चांगले असतात अनेक प्रसंगी ते आपणास मदत करतात. विद्यार्थिनींना अत्यंत मनमोकळेपणे बोलण्यास भाग पाडून त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांना दिली व त्यांच्या मनात पोलीस विभागाविषयी विश्वास निर्माण केला. उपक्रमाचे प्रास्ताविक करताना अध्यक्ष भास्कर आंबेकर म्हणाले की, शहरातील अनेक मुलींचा शाळा महाविद्यालये सुटल्यावर उपद्रवी व गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून छेडछाड व पाठलाग करतात. अशा वाईट बाबींचा सामना त्यांना करावा लागतो. परंतु सामाजिक दडपण व आपले शिक्षण बंद होण्याची भीती या कारणाने विद्यार्थिनी त्यांच्यावर होणारा हा अन्याय निमूटपणे सहन करतात. त्या मनात भीती बाळगुण या परिस्थितीचा सामना करतात.
पुढे बोलताना अंबेकर म्हणाले की, आपल्यावर होणारा अन्याय-त्रास तुम्ही अजिबात सहन करू नका. त्याबाबत आपले शिक्षक, पालक, पोलिस विभाग यांच्याशी बोलून संबंधिताचा बंदोबस्त व्हावा याकरिता प्रयत्न करावेत. त्याचबरोबर मुलींनी स्वयंसंरक्षणाचे धडे घेऊन स्वतः अशा संकटांचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित व्हावे व स्वतःचे मनोबल वाढवावे. असेही ते म्हणाले. तसेच जालना शहरातील प्रत्येक शाळेत संस्थाचालकांशी संपर्क करून हा उपक्रम शहारातील शाळा-शाळात राबविणार असल्याचे जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर म्हणाले.
तात्काळ दामिनी पथकाची स्थापना करा –
जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर व माजी आमदार संतोष सांबरे यांनी आज जालना जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांची भेट घेऊन तात्काळ दामिनी पथक स्थापन करून शहरातील शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थिनी व महिलांना गुंड प्रवृत्तीच्या नागरिकांपासून होणार्या त्रासा पासून दिलासा द्यावा, अशी मागणी केली.