जालना (प्रतिनीधी) जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय २०२४ – २५ याच शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यास अखेर केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात आपण सातत्याने दिलेला लढा, घेतलेली संघर्षाची भूमिका आणि मंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेला पाठपुरावा याचे फलित म्हणून चालू वर्षापासून सदर महाविद्यालय सुरू करण्याच्या प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले असून जनतेला दिलेला शब्दही प्रत्यक्ष साकार केल्याचे समाधान मिळाल्याची भावना जालना विधानसभा मतदार संघाचे आमदार कैलास गोरंटयाल यांनी आज मंगळवारी येथे एका भरगच्च पत्रकार परिषदेत बोलून दाखवली.
शहरातील हॉटेल अंबरमध्ये आज मंगळवारी दुपारी आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस युवा नेते अक्षय गोरंटयाल, विजय चौधरी, राम सावंत, महावीर ढक्का, जगदीश भरतीया, दीपक भुरेवाल, वाजेद पठाण, विनोद रत्नपारखे, हरीश देवावाले, रमेश गौरक्षक,अतीक खान, शुभम राऊत, शेख इब्राहिम, विष्णू वाघमारे संजय भगत आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना आ. कैलास गोरंटयाल म्हणाले की, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार असतांना जालना येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर व्हावे यासाठी आपण आग्रही मागणी केली होती. त्यावेळी तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री आ.अमित देशमुख यांनी तज्ञ अधिकाऱ्यांचे एक पथक जालना येथे पाठवून इंदेवाडी जागेची पाहणी केली होती. त्यानंतर स्वतः देशमुख यांनी देखील जालना येथे येवून अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या जागेची पाहणी करून पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. दरम्यानच्या काळात महाविकास आघाडीचे सरकार पायउतार होऊन नवीन सरकार सत्तेत आले. मुंबईत आयोजित अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील काही जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यात जालन्याचा समावेश नसल्याने आपण या निषेधार्थ विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून उपोषण करत राज्य सरकारचे लक्ष वेधले. त्यावेळी आ.राजेश टोपे, आ. राजेश राठोड, आ. सतीश चव्हाण यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी आपल्याला पाठिंबा दिला होता. आपण उपोषण करत असतांनाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळाच्या सभागृहात जात असतांना त्यांनी आपल्या पाठीवर थाप देत उपोषण मागे घेण्याचे सांगत सभागृहात तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना बोलवून जालन्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. त्यानंतर आर्थिक तरतूद करण्यासह सदर महाविद्यालय मंजुरीचा प्रश्न मार्गी लागल्याचे आ.गोरंटयाल यांनी सांगितले. महत्वाची बाब म्हणजे या मंजुरीनंतर मेडिकल कॉलेजसाठी जागेचा तिढा निर्माण झाला. इंदेवाडी येथे पूर्वी पाहणी करण्यात आलेली जागा मनोरुग्णालयासाठी मंजूर करण्यात आली. त्यामुळे नंतर पुन्हा जागेचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ड्रायपोर्ट जवळ, खादगाव, निधोना, शहरातील कन्हैय्यानगर येथील उपलब्ध जागांची पाहणी करून शेवटी कन्हैय्यानगर येथील शासकीय जागा मेडिकल कॉलेजसाठी निश्चित करण्यात आली मात्र, तेथेही पुन्हा अडथळे आल्याने अखेरीस जालना – अंबड रोडवरील काजळा पाटी जवळ गणेश नगर येथील शासकीय जमिनीची पाहणी करून सदर जागा निश्चित करण्यात आली. राज्याचे विद्यमान वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील आपल्याला सातत्याने सकारात्मक प्रतिसाद देत जागेचा आणि मेडीकल कॉलेज मंजुरीसाठी निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी मौलाची मदत केली असून स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि त्यांच्या अन्य सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यासाठी मोठे सहकार्य केल्याचे आ.कैलास गोरंटयाल यांनी सांगितले. दिल्ली येथून आलेल्या वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टरांच्या पथकाने गणेश नगर येथील जागेची तसेच मेडिकल कॉलेज सुरू करण्यास मंजुरी मिळाली तर त्यासाठी बगडीया हॉटेल आणि ग्लोबल गुरुकुल येथील जागेची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल संबंधितांकडे सादर केल्याचे सांगून आ.कैलास गोरंटयाल म्हणाले ग्लोबल गुरुकुलची जागा मेडिकल कॉलेजसाठी निश्चित करण्यात आली. मात्र, काही त्रुटी असल्याने पुन्हा एकदा अडचणी निर्माण झाल्या होत्या. केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांच्या कोर्टात चेंडू गेल्यानंतर प्राध्यापक व तांत्रिक पदांची भरती करण्यासाठी त्यांच्याकडे दोन महिन्यांची मुदतवाढ मागण्यात आली आणि या मुद्दतीत राज्य सरकारच्या मदतीने सदर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जालन्यातील मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी शासनाची मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाने केवळ मंजुरी दिली नाही तर कॉलेज इमारतीचे भाडे आणि लाईट बिल, मनपा कर यासाठी लागणारा खर्च देखील उचलला असल्याचे स्पष्ट करत तिसऱ्या राऊंड मध्ये जालन्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल असा विश्वास आ. कैलास गोरंटयाल यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी दत्ता पाटील घुले,शिवप्रकाश चितळकर, संतोष माधोवाले, शेख करीम लीडर, गणेश चौधरी, चंद्रशेखर कोताकोंडा, चंद्रकांत रत्नपारखे, छोटू चित्राल आदींची उपस्थिती होती.
आता एम.डी. आणि एम.एस.साठी प्रयत्न करणार
जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर दोन वर्षांनी जालना येथे एम. डी. आणि एम. एस. साठी आपण प्रयत्न करणार आहोत. आणि आणखी चार वर्षानंतर म्हणजे २०२८ मध्ये सुपर स्पेशालिटीची तयारी करणार असल्याचे आ.कैलास गोरंटयाल यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. जालन्यातील मेडिकल कॉलेजसाठी किमान १ हजार कोटींची आवश्यकता असून आतापर्यंत ३६४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. जालन्यासह राज्यातील अन्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन लवकरच होणार असल्याची चर्चा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री ते तलाठी सर्वांचे मानले आभार
जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न, त्यासाठी येणाऱ्या अडचणी याविषयी आपण विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात प्रभावीपणे आवाज उठवला आणि राज्यकर्त्यांचे लक्ष वेधले. त्यामुळेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे आ.कैलास गोरंटयाल यांनी स्पष्ट केले. कॉलेज मंजुरी ते सदर कॉलेज सुरू करण्यापर्यंत ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे आ.कैलास गोरंटयाल यांचे विशेष आभार मानले. त्यात प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री ना. जे. पी. नड्डा, ना. प्रतापराव जाधव, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री गिरीश महाजन, तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री आ.अमित देशमुख, जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे, आयुक्त राजीव नीलिकर, जालना येथील अधिष्ठाता डॉ. सुधीर चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, तहसिलदार श्रीमती छाया पवार, सर्व नायब तहसिलदार,मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांचा समावेश आहे.