उमेद अभियानाच्या माध्यमातून काम करणार्या कर्मचार्यांना शासकीय सेवेत समावेश करण्यात यावे या व इतर प्रलंबीत मागण्यासाठी सोमवार दि. 30 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता उमेदच्या महिलांनी जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढला होता. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना यांना निवेदनही देण्यात आले.
उमेदच्या महिलांच्या मागण्या पुर्ण करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुलै महिन्यात आश्वासन दिले होते, परंतु, अडीच महिने उलटूनही मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या सर्व महिला, कार्यरत केडर कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी आज मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी केली. उमदेच्या कर्मचार्यांचा समावेश शासकीय सेवेत करण्यात यावा तसेच उमेदसाठी स्वतंत्र विभाग कार्यरत करण्यात यावा आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्यात. उमेद अभियानाच्या माध्यमातून हजारो अधिकारी व कर्मचारी मागील दहा वर्षांपासून कंत्राटी स्वरूपाने काम करीत आहेत. सर्व कंत्राटी कर्मचार्यांच्या मागील तीन वर्षापासूनच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी शासन दरबारी मांडण्यात आल्या. परंतु, त्या अजुनही मान्य होत नसल्याने जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालसमोर सभा घेत मोर्चाचा समारोप केला.