जालना : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेसाठी कंबर कसली आहे. सध्या विविध पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहे. त्यातच आता जालना येथे काँग्रेसच्या विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान दोन गटात राडा झाल्याची माहिती मिळत आहे.
जालना येथे काँग्रेसच्या विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. यावेळी दोन गटांमध्ये मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळालं. काँग्रेसचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल आणि काँग्रेस नेते अब्दुल हाफिज यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची होऊन जोरदार घोषणाबाजी झाली. निवडणूक निरीक्षक खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या यांच्यासमोरच काँग्रेस समर्थकांचा हा गोंधळ पाहायला मिळाला.
काय म्हणाले कैलास गोरंट्याल?
दरम्यान, काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी ही घटना शुल्लक असल्याचे भासवत समर्थकांकडून जिंदाबाद मुर्दाबादच्या घोषणा झाल्याचे म्हटले. याशिवाय कोण अब्दुल हाफिज? असा सवाल करत आपला राग देखील व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राहुल गांधी, नाना पटोलेंकडे तक्रार करणार : अब्दुल हाफिज
तर, काँग्रेसचे नेते अब्दुल हाफिज यांनी कैलास गोरंट्याल यांच्या समर्थकांनी स्टेजवरून ढकलण्याचा प्रयत्न करत विरोधात घोषणाबाजी केल्याचा आरोप केलाय. दरम्यान या प्रकरणी आपण काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या राड्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे.