जालना (प्रतिनीधी) मोठे शक्ती प्रदर्शन करत गर्दी जमवली असली तरी त्याचे रूपांतर मतपेटीत होत नाही असा टोला महाविकास आघाडीचे जालना विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार आ. कैलास गोरंटयाल यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार अर्जुन खोतकर यांना लगावला आहे.
जालना विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी भव्य शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे जालना विधानसभा मतदार संघातील उमेदवार आ. कैलास गोरंटयाल यांच्याशी उपस्थीत पत्रकारांनी संवाद साधला असता ते म्हणाले की, नवीन उमेदवार असल्यास ते शक्तिप्रदर्शन करतात. आम्ही तर मैदानात आहोत. शक्ती प्रदर्शनाची पद्धत आता बंद झाली असून आज रॅलीला झालेली गर्दी ही लक्ष्मी रूपाने झाल्याची टीका गोरंटयाल यांनी केली. पक्षातील बंडखोरी बाबत विचारले असता ते म्हणाले की, या बाबत पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील. प्राप्त नामनिर्देशन पत्रांची उद्या बुधवारी छाननी होत असून दि. ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून या दिवशी जालना विधानसभा मतदार संघातील सर्व चित्र स्पष्ट होईल असा आशावाद व्यक्त करून त्यानंतर काय ते बघू असे देखील गोरंटयाल यांनी स्पष्ट केले. कुणी शक्ती प्रदर्शन करत गर्दी जमवल्याने काही होत नाही. लोकांचं आता ठरलं असून पाच वर्षे कुणी काय काम केले ही बाब लक्षात घेऊनच जनता पाठीशी उभी राहते. पक्षाचा एबी फॉर्म मला मिळाला असून लोकशाही असल्याने उमेदवारी मागण्याचा सर्वांना अधिकार असतो. त्यामुळे फॉर्म कुणीही भरू शकतो. त्यांना आपण थांबवू शकत नाही. जालना विधानसभा मतदार संघात झालेल्या बंडखोरी बाबत काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. आपण उद्या बुधवार पासून प्रचाराला सुरुवात करणार असल्याचे गोरंटयाल यांनी पत्रकारांनी उपस्थीत केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.