जालना – जालना जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंमलबजावणी सुरु आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध असाव्यात यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे कार्यवाही सुरु आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज 101-जालना विधानसभा मतदार संघातील स्वामी विवेकानंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, श्री सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, फातेमा उर्दू हायस्कूल, शांतिनिकेतन विद्यामंदिर आणि कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह या मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देवून येथील सोयी-सुविधांची पाहणी केली. यावेळी पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, मनपा आयुक्त संतोष खांडेकर आदीची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा पुरविणे ही संबंधित विभागाची जबाबदारी आहे. सर्व अधिकऱ्यांनी स्वत: मतदान केंद्राना भेटी देवून पाहणी करून मुलभूत सुविधांच्या उपलब्धतेची खात्री करावी. आवश्यकतेनुसार तात्काळ डागडुजी व दुरुस्ती करुन घ्यावी. सर्व मतदान केंद्रांवर प्रकाशाची व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहे, रॅम्प आदींची व्यवस्था करण्यात यावी.
वेब कास्टिंगसाठी निवडलेल्या मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधांची खात्री करावी. मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग, सीसीटीव्ही किंवा व्हिडिओग्राफीसाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. ज्या मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदार मतदान करतील तेथे व्हीलचेअर व स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात यावी. आयोगाच्या सूचनानुसार आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना डॉ.पांचाळ यांनी यावेळी दिल्या.
तसेच जिल्ह्यातील आदर्श मतदान केंद्र सुसज्ज असावीत. कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये. यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी. मतदान केंद्रावर मतदारांना बसण्यासह सावलीची व्यवस्था करावी. मतदान केंद्रावर प्रथमोपचार सुविधा देतांना सोबत एक आरोग्य कर्मचारी अधिकारी नियुक्त करुन, आवश्यक ती सर्व औषधे मतदान केंद्रावर ठेवण्याच्या सूचना ही डॉ. पांचाळ यांनी यावेळी दिल्या.