मुंबईतील एका पोलीस ठाण्यामध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीच्या घटनेत एक पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. संबंधित पोलिसाला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमी पोलीस अधिकाऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं.
‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील खेरवाडी पोलीस ठाण्यातील स्टोअर रुमला सोमवारी आग लागली. या आगीत महत्त्वाची कागदपत्रे जळाली आहेत.
यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरविंद जनार्दन खोत यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण तेच आगीच्या कचाट्यात सापडले. या दुर्दैवी घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही.
सायन रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मयांक त्रिपाटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५६ वर्षीय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरविंद खोत हे ९५ टक्के भाजले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.