जालना । मुलगी काहीही न सांगता घरातून निघून गेल्याने समाजात अपमान झाल्याचा राग मनात धरून चक्क बापाने मुलीला फाशी देऊन अंत्यविधी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत चंदनझिरा पोलीस ठाण्यात मुलीचा बाप संतोष भाऊराव सरोदे व नामदेव भाऊराव सरोदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज दिनांक 14/12/2022 रोजी राजुर रोडवर चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोउपनि पोहार, पोउपनि झलवार, पोना चव्हाण , पोना देशमुख, पोहेकॉ जितेंद्र तागवले पेट्रोलिंग करत असतांना त्यांना पिरपिंपळगाव शिवारामध्ये संतोष भाऊराव सरोदे या व्यक्तीने त्याच्या मुलीचा मयत झाल्याने परस्पर अत्यंविधी करून पोलीसांना कोणतही खबर न देता विल्हेवाट लावली असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी पिरपिंपळगावचे पोलीस पाटील बावणे यांना संपर्क करून त्यांचेसह संतोष भाऊराव सरोदे यांच्या शेतातील वस्तीवर जावून संतोष भाऊराव सरोदे व नामदेव भाऊराव सरोदे यांना मिळालेल्या माहितीच्या संबंधाने विचारपुस केली. त्यावेळी त्यांनी मुलगी नामे सुर्यकला ऊर्फ सुरेखा संतोष सरोदे (वय 17 वर्ष) ही मागील दोन तीन दिवसांपूर्वी घरुन निघुन गेली होती.
ती मंगळवारी (दि. 13) रोजी दुपारी घरी आल्यानंतर तीस विचारपुस करता तीचे सोबत वाद झाला होता. ती आम्हास काही न सांगता घरातुन गेल्याने आमचा अपमान झाला होता. त्यावरुन दुपारी 04.00 वा .च्या दरम्यान तिला कडुलिंबाच्या झाडाला दोरीने गळफास देवुन जिवे ठार मारले आहे. नंतर संध्याकाळी तिला जाळुन टाकुन अत्यंविधी केल्याचे सांगीतले. त्यावरुन पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता पोल्टी फॉर्मच्या लगत अत्यंविधी केल्याचे तसेच राख पोत्यात भरून ठेवल्याचे आढळून आले. त्यावरून पोहेकॉ जितेंद्र तागवले यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात संतोष भाऊराव सरोदे व नामदेव भाऊराव सरोदे यांच्याविरुद्ध भादवी कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेतले असून याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.