जालना : सामाजिक, राजकीय कार्यात निस्सीमपणे अविरत ध्यास घेत समाजहिताचा विचार करणारे रमेश देहेडकर यांचे कार्य नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहे, असे गौरवोद्गार आमदार कैलास गोरंट्याल यांनी सोमवारी ( ता.१२) गौरव समारंभात बोलताना केले.
पाच दशकांपासून सामाजिक, शैक्षणिक कार्यासह पत्रकारिता क्षेत्रात कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते रमेश देहेडकर कार्य गौरव समारंभाचे आयोजन सोमवारी ( ता.१२) करण्यात आले होते.
मुद्रा साहित्य सेवा संस्थेतर्फे जुना जालन्यातील स्वयंवर मंगल कार्यालयात सोमवारी अभिष्टचिंतन कार्य गौरव
आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार कैलास गोरंट्याल हे होते. कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, रसना देहेडकर, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष कल्याणराव देशपांडे, जेष्ठ साहित्यिक डाॅ.रावसाहेब ढवळे, कवी- पत्रकार डाॅ.सुहास सदाव्रते, जाणीव अस्मिता साहित्य परिषदेचे अध्यक्ष राम गायकवाड, अंकुशराव राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू जाधव,मातंग मुक्ती सेनेचे अध्यक्ष अशोक साबळे,मुद्रा साहित्य संस्थेचे अध्यक्ष कैलास भाले,प्रा.पंढरीनाथ सारके यांची प्रमुख उपस्थिती होती.
सामाजिक कार्यकर्ते रमेश देहेडकर यांचे ७१ व्या वर्षात पदार्पण निमित्त दीप प्रज्वलित करून औक्षण करण्यात आले. कार्यक्रमात कवी- पत्रकार डाॅ.सुहास सदाव्रते, अशोक साबळे, डाॅ.रावसाहेब ढवळे, राजू जाधव, कवी राम गायकवाड, कल्याणराव देशपांडे यांची समयोचित भाषणे झाली.
आयुष्याची पन्नास वर्ष सामाजिक, राजकीय कार्यात निष्ठेने काम करताना अनेक कटूगोड अनुभव आले. परंतु समाजाचे आपण देणे लागतो, ही प्रांजळ भूमिका घेवून राजकीय क्षेत्रात यश मिळवू शकलो नाही, याची खंत असल्याचे सांगून आपण सामाजिक कार्यात व्यस्त असल्याचे गौरव मूर्ती रमेश देहेडकर यांनी सत्काराला उत्तर देताना भावना व्यक्त केल्या.
सामाजिक कार्यात अविरत कार्य करणारे आमचे स्नेही रमेश देहेडकर यांचे ब्राह्मण समाजासाठीचे योगदान मोठेच आहे. स्पष्ट वक्तेपणा, निर्भीडता अशी ओळख असलेले श्री.देहेडकर यांचे कार्य जाती धर्माच्या पलीकडील चौकटी मोडणारे आहे, असे ब्राह्मण सभेचे अध्यक्ष कल्याणराव देशपांडे यांनी शुभेच्छा देताना सांगितले.
कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनकर घेवंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.प्रभाकर शेळके यांनी केले. कवी शिवाजी तेलंग यांनी आभार मानले.कार्यक्रमास मनीष पाटील, सुनील लोणकर,सुधाकर वाहुळे, शिवकुमार बैजल, जेष्ठ साहित्यिक प्रा.बसवराज कोरे, ज्ञानदेव पायगव्हाणे, श्रीकांत शेलगावकर, डाॅ.राहूल देहेडकर, उमेश कुलकर्णी, डाॅ.संजय रईखेडकर, विधिज्ञ दीपक कोल्हे, पवन जोशी, प्रा.राजकुमार बुलबुले, डाॅ.दिगंबर दाते, शांतीलाल बनसोडे, डॉ.राजेंद्र गाडेकर, बंडू काळे, नवनाथ लोखंडे यांच्यासह, देहेडकर परिवार सदस्यांची उपस्थिती होती.