जालना – जिल्हा रेशीम शेती विकास कार्यालय व जिल्हा परिषद प्रशाला, राणी ऊंचेगाव ता. घनसावंगी यांच्या संयुक्त विद्यमाने पानेवाडी ता. घनसावंगी येथील रेशीम उद्योग करणारे शेतकरी श्री. जांधे यांच्या शेतात जिल्हा रेशीम उद्योग विकास अधिकारी अजय मोहिते यांनी विद्यार्थ्यांना रेशीम उद्योगाचे धडे दिले. जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्या संकल्पनेतील एक दिवस शाळेसाठी या उपक्रमाचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती नूतन मघाडे यांनी केले. शेती तंत्रज्ञानामध्ये दिवसेंदिवस बदल होत चाललेला आहे. पारंपारिक शेतीला पूरक जोड धंद्याची मदत दिल्या शिवाय शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होणार नाही. विज्ञान विषय हा फक्त शाळेत पाठ्यपुस्तकातून शिकण्याचा विषय नाही तर त्यातून भविष्यात स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारून इतरांना देखील आपल्याला मदत करता आली पाहिजे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी समृध्द झाल्या शिवाय देशाची प्रगती होणार नाही. शेतीला विज्ञान तंत्रज्ञानाच्या, जोड धंद्याच्या जोडीने श्री.जांधे हे शेतकरी लखपती होऊ शकतात तर इतरही असे करू शकतात ही प्रेरणा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
अजय मोहिते यांनी विद्यार्थांना हर घर नर्सरी या उपक्रमांअतर्गत प्रत्येक कुटुंबाने किमान 50 रोपे तयार करण्यासाठी प्रेरक मार्गदर्शन केले. तसेच रेशीम उद्योगाबद्दल सविस्तर माहिती दिली. भारतासारख्या कृषी प्रधान देशात आज रेशीम उद्योगाची गरज का आहे हे समजून सांगितले. विद्यार्थ्यांना पारंपरिक शेतीमधून होणारे उत्पादन व रेशीम उद्योगातून होणारे उत्पादन याची तुलना करून रेशीम शेती फायदेशीर कशी होऊ शकते हे सांगितले. रेशीम शेतीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या रोपांचे बेन, आळ्या, कोष विक्री, त्याचे मार्केटिंग, शासनाची योजना, वर्षातून एक एकर मध्ये साडेतीन लाख रुपयांची कमाई शेतकरी कसा करू शकतो याबद्दल माहिती दिली. प्रत्यक्ष रेशीम उद्योग करणारे शेतकरी श्री. जांधे, त्यांच्या पत्नी व वडीलांनी मुलांना आपले अनुभव सांगितले. रेशीम आळी संगोपन गृह, तयार कोष, तुती लागवड केलेली शेती विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष बघीतली. ही सर्व माहिती व प्रत्यक्ष रेशीम उद्योग पहिल्यांदा बघितल्याचे मत विद्यार्थ्यांनी नोंदविले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा रेशीम उद्योग विकास कार्यालयाचे एस.आर जगताप, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक तसेच जिल्हा परिषद प्रशाला राणी उंचेगाव येथील श्री. केदार यांनी परिश्रम घेतले. शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती कवानकर व इतर शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती यांचे सहकार्य लाभले.