आप्पा परब ….. एक सामान्य गिरणी कामगार, दादरच्या रानडे रोडवरच्या फुटपाथवर जुनी पुस्तके, दिवाळी अंक, नियतकालिके विकणारे विक्रेते, प्रख्यात नाणी संग्राहक व नाणी तज्ज्ञ ते इतिहास संकलक – संशोधक हा आप्पांचा जीवनप्रवास ऐकून कोणीही थक्क होऊन जावे अशीच आप्पांची ८३ वर्षाची आयुष्यभराची वाटचाल आहे. इतिहासावरील निष्ठेप्रमाणेच ज्यांनी हयातभर इतिहासाची, गडकिल्ल्यांची सेवा केली असे महत्वपूर्व ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे आप्पा परब होय. महाराष्ट्रातील साडेसहाशे गडकिल्ल्यांचा केवळ इतिहासच नव्हे तर त्या गडकिल्ल्यांमागील विज्ञान, वास्तुशास्त्र, भूगोल, तत्कालीन सामाजिक – आर्थिक – राजकीय – सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्टया त्यांचे महत्व सांगणारे आप्पा परब हा गडकिल्ल्यांचा चालता-बोलता इतिहास आहे. आपले अवघे आयुष्यच आप्पांनी गड – किल्ल्यांवरील संदर्भ संशोधनासाठी झोकून दिले आहे. अवतीभोवतीची परिस्थिती कितीही चंगळवादी होऊ दे आपण आपले अंगीकारलेले व्रत व्रतस्थपणे कसोशीने पाळायचे हा खाक्या आप्पांनी आयुष्यभर जपला. ते करण्यासाठी जे काही करायचे ते प्रसंगी अपमान सोसून आप्पांनी केले. त्यांनी अक्षरशः हजारो लोकांना गडकिल्ले दाखवले पण ते करण्यासाठी त्यांनी कधी एक छदामही कोणाकडून घेतला नाही. ‘जे किल्ले मावळ्यांनी तानाजी – बाजी – येसाजी यांनी प्रसंगी रक्त सांडून राखले तो माझ्या पूर्वजांचा वारसा दाखवण्यासाठी, सांगण्यासाठी मला पैशाची गरज नाही.’ हा विचार आप्पा नेहमी जपत आले व त्या बरहुकूम ते वागत आले. ‘माझा धर्म इतिहास, माझे दैवत शिवराय. माझी जात गडकिल्ल्यांची. त्या थोर युगपुरुषाने कधी जातीभेद मानला नाही, तर मग मी का मानू ?’ हा उच्च विचार आप्पांनी आपल्या उरात कोरून ठेवला आहे. आप्पांचा यामागील स्वार्थ एकच, आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या यशोगाथा, त्यांचे कार्यकर्तृत्व भावीपिढीला योग्यरितीने समजावे. प्रतिकूल परिस्थितीतही शिवरायांनी व त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी केलेला असीम त्याग येणाऱ्या पिढीला आकलन व्हावा यासाठी अपार काबाडकष्ट घेऊन आप्पा ही उरफोड करीत आहेत. त्यांनी छत्रपतींच्या कार्याचा झपाटून अभ्यास केला. प्रचंड तप केले, कठोर जीवन जगले. इतिहासाची ही पाने शोधताना आणि त्यासंबंधाने विषयवार संगती लिहिताना जेव्हा भूगोल बोलत नाही तेव्हा विज्ञान व आकाशातील ग्रह तारे बोलतात या तत्वज्ञानाची सांगड घातली. गडकिल्ल्यांचा अभ्यास करताना भूगोल आणि विज्ञान एकमेकांस कसे पूरक आहेत हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या पुस्तकांचे विषय जरी पाहिले तरी त्यांचे लिखाण हे चतुरस्त्र लेखकाचे लिखाण आहे हे समजते. आप्पांच्या वाड्.मयातील प्रज्ञा, शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी शेकडो वेळा अनेक गडांवर जावून केलेले प्रत्यक्ष प्रयत्न, आणि त्यातून शिवप्रेमींना मिळणारी प्रसन्नता हे अनुभवता येते. नेहमी आपल्या पाठीवर आपली सॅक बांधून घेऊन आपले पिण्याचे पाणी नेहमी सोबत ठेऊन गड चढणारे आप्पा आज महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यातून भटकंती करणाऱ्या इतिहासप्रेमींना हे आपले हक्काचे मार्गदर्शक वाटतात. त्याला कारणेदेखील तशीच आहेत. गड -किल्ल्यांसंदर्भात कोणताही अडचणींचा प्रश्न असो आणि कितीही वेळा विचारा, आप्पा कपाळावर एकही आठी पडू ने देता हसतमुख चेहऱ्याने तुमचे समाधान करतात. त्यासाठी तासनतास ते माहिती पुरवतात. अनुभवाच्या दाण्यांचे पीठ ते आपल्या वाणीतून आणि लेखणीतून देतात. ऊन,वारा अन पाऊस याची तमा न बाळगता दऱ्याखोऱ्यातून हिंडताना आप्पा तहानभूक विसरतात. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी (शंभाजी), तानाजी, बाजीप्रभूंसारख्या व्यक्तींमुळे आप्पांच्या प्रतिभेला अनेकदा नव्याने अंकुर फुटू लागतात. या भटकंतीत ठोस अभ्यासाने केलेले विधान ही काळ्या दगडावरची अमीट रेष ठरते. गडकिल्ल्यांतून भटकंती करताना तिथला चिरान चिरा आप्पांशी बोलतो. जणू इतिहासच वर्तमान होऊन आप्पांच्या मुखाने बोलू लागतो. हा इथे असा बाजी लढला…. तानाजी – सूर्याजी हे इथून असे दोरखंडाने गडावर चढले…. महाराजांच्या घोडीच्या टापा या इथून अशा एक ना असंख्य कथा आणि बाहू-मनगटांना स्फुरण चढविणाऱ्या घटनांची मालिका आप्पा सांगतात.
म्हणूनच आप्पांविषयी म्हणावेसे वाटते की,
प्राचीवरूनि मावळतीच्या, जगा सांग भास्करा ।
रायगडाचा शिवसूर्य तो कधी न मावळता ।।
सह्यगिरीत दुमदुमतील भेरी, गर्जतील खोरी ।।
हिंडता फिरता तुम्हा सांगतील, त्यागाची महती ।
तुवा घडावे अन घडवावे, पेटवीत ज्योती ।।
आप्पांचा जन्म कोकणात गरीब कुटुंबात झाला असला आणि उदरनिर्वाहासाठी त्यांनी कोहिनुर मिलमध्ये काम केले असले तरी त्यांचे व्यक्तिमत्व आणि स्वीकृत कार्य हे बौद्धिक ऋषिकार्य आहे असेच मी समजतो. मुळात त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मागोवा घेणे वाटते तितके सोपे नाही. एकादृष्टीने शिवकाळाचे चिंतन करणारे ‘सिद्धऋषी’ म्हणूनच त्यांचा अभ्यास केला पाहिजे.
आप्पा परब हे वास्तविक प्रसिद्धि-पराड.मुख व्यक्तिमत्त्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी त्यांच्या कार्याची स्तुती केली. आप्पांनी वर्तमानपत्रातून लेखन केले नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र कारकिर्दीचा बारकाईने अभ्यास करीत सिद्धहस्त लेखणीने मराठी भाषेत ४० हून अधिक त्यांची ग्रंथसंपदा निर्माण केली आहे.
आप्पांच्या वयाने ऐंशी पार केली आहे. तरीही आज आप्पांच्या व्यक्तित्वाकडे आणि कार्याकडे दृष्टीक्षेप टाकला तर शिवकार्याचा ध्यास घेतलेला हा योगी शरीराने थकलेला नाही, हे प्रतित होते. सह्याद्रीच्या कडेकोपऱ्यात तरुण पिढीला कोणतेही मानधन न घेता इतिहास शिकविणारा आप्पा परब हा कर्मयोगी या साऱ्या सव्यापसव्यात मात्र उपेक्षित आहे. स्वाभिमानी आप्पांना हे अशा प्रकारचे लेखन आवडणारही नाही. परंतु ही वस्तुस्थिती आहे. रुढार्थाने आप्पांच्या विषयी लिहिताना आजच्या स्वकेंद्रित होत चाललेल्या समाजापुढे एका आदर्श व्रतस्थ लेखकाचे, इतिहास संशोधकांचे कार्य ठेवावे असे मनोमन वाटत आहे. शासन आणि समाज या दोन्ही घटकांनी म्हणावी तशी त्यांची दखल घेतली नाही हे शल्य शिवप्रेमीच्या मनात आहे. आजच्या या तत्वे, चारित्र्य, सत्यनिष्ठ विचारधारा याबाबतीत फारसे फिकीर न बाळगण्याच्या युगात नेमक्या याच गोष्टी ज्यांनी आयुष्यभर तळ हातावरच्या फोडाप्रमाणे कसोशीने जपल्या अशा आप्पा परब यांना चतुरंग पुरस्कार मिळणे ही मोठी आशादायक बाब आहे. आप्पा प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, परंतु केवळ त्यांचे व्यक्तिमहात्म्य न वाढवता तत्व आणि सामाजिक कार्य यांचा मेळ त्यांनी साहित्यातून निरपेक्षपणे कसा घेतला याची दखल ‘चतुरंगने’ घेतली. ती ओळख जगाच्या कानाकोपऱ्यात सहज पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांनी पुढाकार घ्यायला पाहिजे.
– रवींद्र मालुसरे