पुणे : उत्तर भारतात दाट धुके आणि थंड हवा वाढल्यामुळे या भागात जोरदार थंडी सुरू झाली आहे. या भागाकडून राज्याकडे थंड वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा सुरू होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात पडणाऱ्या थंडीपैकी सुरुवातीच्या १५ दिवसांतील थंडी मंदौस चक्री वादळाने हिरावून घेतली होती. मंदौस चक्री वादळाचा परिणाम आता पूर्णपणे ओसरला आहे.
उत्तर भारतात एका पाठोमाग एक संचलनित असलेल्या पश्चिमी झंजावाताच्या परिणामामुळेच सध्याचे महाराष्ट्रातील किमान व कमाल तापमान गेल्या दोन दिवसांपासुन हळूहळू घसरत आहे. तरीदेखील अजूनही कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा दोन अंश सेल्सिअसने जास्तच आहे. मात्र, आता त्यामध्ये घसरण होऊन रात्रीच्या थंडीत दिवसागणिक वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारपासून (२० डिसेंबर) संपूर्ण राज्यात पहाटेच्या किमान तापमानात घट होऊन दहा अंश सेल्सिअसपर्यंत, तर दुपारच्या कमाल तापमानातही घट होऊन ते २९ अंश सेल्सिअसपर्यंत स्थिरावू शकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता डिसेंबर महिन्यातील उर्वरित दहा-बारा दिवसांत थंडीत चांगलीच वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.