प्रेम कधी कुणावर कसं होईल हे सांगता येत नाही. प्रेमासाठी लोकं वाट्टेल ते करतात. प्रेमात जात पात बघितल्या जात नाही. मात्र, कधी-कधी प्रेमात फसवणूक देखील होते. त्यानंतर अनेकांना मनस्ताप होतो. असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला आहे. एका विवाहित महिलेने प्रेमासाठी आपल्या पतीला सोडलं आणि आपल्या प्रियकरासोबत राहायला गेली. त्यानंतर तिच्यासोबत जे घडलं ते हादरवून टाकणारं होतं.
ही घटना मध्यप्रदेशातील आहे. येथील एका विवाहित महिलेची सोशल मीडियावर एका तरुणासोबत ओळख झाली. कालांतराने दोघांमध्ये संभाषण सुरू झालं. काही दिवसांनी मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांचाही प्रेमात इतका आकंठ बुडाला की दोघांनीही घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. तरुणाच्या सांगण्यावरून विवाहित महिलेने आपल्या पतीसह दोन मुलांना सोडून दिलं आणि प्रियकरासोबत फरारझाली. मात्र, नंतर तिला पश्चातापशिवाय काहीच मिळालं नाही. लग्नाच्या बहाण्याने तरुणाने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. महिलेने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकल्यानंतर तो पळून गेला आणि त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं.
आता पीडित महिलेच्या तक्रारीवरून महिला पोलीस ठाण्यात बलात्काराच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, आरोपी तरुणाशी तिची भेट सोशल मीडियावरून झाली होती. त्यानंतर सोशल मीडियावर दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. कालांतराने दोघांमध्ये जवळीक वाढत गेली. पीडितेने या तरुणाला सांगितलं होतं की,ती विवाहित असून तिला दोन मुलं आहेत. यावर तरुणाने तिला आपण लग्न करू असं आश्वासन दिलं. महिलेनं पोलिसांना सांगितलं की, पती तिला मारहाण करायचा. नवऱ्याच्या वागण्याने तिला खूप त्रास होत होता.
त्यामुळेच तिने सदरील तरुणासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. मात्र या तरुणाने पीडितेसोबत लग्न न करता फक्त तिचं लैंगिक शोषण केलं. त्यानंतर तिला सोडून तो फरार झाला. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच, पीडितेने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.