विधानसभा हिवाळी अधिवेशन काळात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी ख्रिस्ती समाजावर पैसे देऊन धर्मांतर केल्याचा खोटा आरोप करून या समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. ख्रिस्ती बांधवांचा सर्वात मोठा सण ख्रिसमस सुरू असून याच काळात असे विधान केले आहे. समाजा समाजात द्वेष पसरवून तेढ निर्माण करून महाराष्ट्र अस्थीर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे निवेदन ख्रिस्ती समाजाने जिल्हाधिकारी यांना दिले आहे. यावेळी आ. राम सातपुते यांच्या प्रतिमेस जोडे मारुन निषेध करण्यात आला.
ख्रिस्ती समाजात खोटे आमिष किंवा पैसे देऊन धर्मांतर होत नाही, तसे असते तर सर्वात प्रथम आम्हीच त्याचा विरोध केला असता. असे निवेदनकर्त्यांनी म्हटले. महराष्ट्रात ख्रिस्ती समाजाच्या प्रार्थना गृहामध्ये धर्मगुरू आणि चर्च मधील लोकांवर समाजकांटकांचे हल्ले वाढले असून त्याबद्दल धर्मांतराच्या खोट्या आरोपाच्या आक्षेपाने झुंडशाही व दडपशाही वाढली आहे. ती त्वरित थांबवावी तसेच त्यासाठी कडक कायदे निर्माण करावे, याच मागणीसाठी नागपूर येथे दि.19 डिसेंबर ते 22 डिसेंबर हिवाळी अधिवेशनकाळात उपोषण करण्यात आले होते.
आ. राम सातपुते यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना शासन होईल यासाठी प्रयत्न करावे त्यामुळे इतरांची देखील ख्रिस्ती समाजावर बदनामी किंवा अन्याय अत्याचार करण्याची हिंमत होणार नाही. समाजाच्या मागण्याची दखल न घेतल्यास आगामी काळात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी ख्रिस्ती समाज समन्वय समिती व इंडियन ख्रिश्चन्स युनायटेड ब्रिगेडचे अध्यक्ष रविकांत दानम, उपाध्यक्ष भोला कांबळे, सचिव लेवी निर्मळ, सुभाष कांबळे, शाम ससाणे, अनमोल कांबळे, करन कांबळे, आदित्य कांबळे, गणेश खरात, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.